शिवसेनेचे अंबादास दानवे सतर्क, बाबुराव कुलकर्णींना चमत्काराची आशा !

शिवसेनेचे अंबादास दानवे सतर्क, बाबुराव कुलकर्णींना चमत्काराची आशा !

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी येत्या 19 ऑगस्टला मतदान होणार आहे. महायुतीचे अंबादास दानवे व आघाडीचे बाबुराव कुलकर्णी यांच्यात थेट लढत होण्याची शक्‍यता आहे. मतांची फाटाफूट करू शकेल असा तिसरा उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्यामुळे संख्याबळाच्या आधारावर युतीची सरशी होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. परंतु ऐनवेळी होणाऱ्या घडामोडी, घोडेबाजार पाहता पारडे कोणत्याही बाजूने झुकू शकते. ही शक्‍यता लक्षात घेता अंबादास दानवे अधिक सर्तक आहेत, तर बाबुराव कुलकर्णी चमत्काराची आशा बाळगून असल्याची चर्चा आहे. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबुराव कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी याचिका केलेले विनोद पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलाचे वय निवडणूक लढवण्यास कमी असल्यामुळे त्यांनी आपले खंदे समर्थक सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकिशोर सहारे यांचा अर्ज दाखल केला आहे. या शिवाय शिवस्वराज्य बहुजन पक्षाच्या एका उमेदवाराने देखील अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतीम मुदत पाच ऑगस्टपर्यंत असल्यामुळे सत्तार समर्थक सहारे हे निवडणुकीतून माघार घेतील अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महायुतीचे अंबादास दानवे विरुध्द आघाडीचे बाबुराव कुलकर्णी यांच्यात थेट लढत होईल असे दिसते. 

पक्षनिहाय संख्याबळावर नजर टाकली तर अंबादास दानवे यांचा विजय निश्‍चित मानला जातो. शिवसेना 141, भाजप 180 असे युतीचे एकत्रित संख्याबळ 321 एवढे आहे. तर कॉंग्रेस 170, राष्ट्रवादी 80 असे आघाडीकडे 250 मतदार आहेत. याशिवाय एमआयएम 28, बसपा, रासप, मनसे व इतर अपक्षांची संख्या 57 एवढी आहे. यात सत्तार समर्थक -36, माजी शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विकासआघाडीचे 5 अशी विभागणी आहे. ही सगळी मते कुणाच्या पारड्यात जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

एकंदरीत विजयासाठी कॉंग्रेस-आघाडीला एमआयएम, सत्तार, जाधव समर्थक सदस्य व अपक्ष अशा सगळ्यांच मतांची गरज पडणार आहे. शिवाय त्यांना युतीची किमान 70ते 80 मते फोडावी लागतील तरच आघाडीचे बाबुराव कुलकर्णी चमत्कार घडवू शकतील, अन्यथा महायुतीचे संख्याबळ पाहता अंबादास दानवे यांच्या विजयाचा मार्ग सुकर दिसतो. 

गेल्या तीन विधान परिषद निवडणुकीतील निकाल व झालेल्या फोडाफोडीवर नजर टाकली तर घोडेबाजारात सरस ठरणारा उमेदवारच या मतदारसंघातून विजयी झालेला पहायला मिळते. कॉंग्रेसचे अब्दुल सत्तार, शिवसेनेचे किशनचंद तनवाणी, व गेल्यावेळी सुभाष झांबड यांनी आर्थिक ताकदीच्या जोरावर या मतदारसंघातून विजय मिळवला होता. महायुतीकडे विजयी होण्यासाठीचे संख्याबळ असले तरी ते राखून कुठल्याही प्रकारचा दगाफटका होणार नाही याची खबरदारी युतीच्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com