रावसाहेब दानवे : भाजपचे छोट्या गावचे अध्यक्ष ते आता केंद्रात राज्यमंत्री

रावसाहेब दानवे : भाजपचे छोट्या गावचे अध्यक्ष ते आता केंद्रात राज्यमंत्री

भोकरदन : तालुक्‍यातील एका छोट्याशा गावातील भाजप शाखेचा अध्यक्ष ते केंद्रीयमंत्री असा थक्क करणारा राजकीय प्रवास असणारे भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष तथा सलग पाचवेळा जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार रावसाहेब दानवे महाराष्ट्राला परिचित आहेत. अस्सल ग्रामीण भाषा, पदाचा बडेजाव नाही. हातावर भाकरी घेऊन खाणे, सर्वसामान्याप्रमाणे जमिनीवर बसणे या आपल्या स्वाभावामुळे केंद्रीयमंत्री पदावर पोचल्यानंतरही दानवे प्रत्येकाला आपल्यापैकीच एक वाटतात हे त्यांचे वैशिष्ट म्हणावे लागेल. 

सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या रावसाहेब दानवे यांची सुरूवातीपासूनच समाजकार्याकडे ओढ होती. त्या माध्यमातूनच त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली. गावातील भाजप शाखेचा अध्यक्ष झालेल्या रावसाहेब दानवे यांचा मग सरपंच, पंचायत समिती सभापती, दोनदा आमदार सलग पाचवेळा खासदार, केंद्रीय राज्यमंत्री आणि पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश असा राजकीय आलेख उंचावत गेला. पक्षपातळीवर देखील त्यांच्यावर महत्वाच्या जबाबदारा आल्या आणि त्यांनी त्या यशस्वीपणे पार पाडल्या. 
1980 पासून राजकारणात सक्रीय असलेले दानवे सुरुवातीला जवखेडा गावचे सरपंच होते. गावातून नंतर त्यांनी तालुक्‍याच्या राजकारणात उडी घेतली आणि पहिल्याच फटक्‍यात भोकरदन पंचायत समितीचे सभापती पद पटकावले. दरम्यानच्या काळात तालुक्‍यात भाजपचे मेळावे, निवडणुक प्रचार सभा, रॅली यात दानवे हिरारीने सहभागी व्हायचे. सगळी यंत्रणा एकहाती राबवत आपल्यातील राजकीय कौशल्य त्यांनी दाखवून दिले होते. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या भोकरदन-जाफराबाद मतदारसंघात 1990 च्या विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी संतोषराव दसपुते यांचा पराभव करत विजश्री खेचून आणली. पहिल्या पराभवातून धडा घेतल्यानंतर आजतागायत दानवे यांना पुन्हा कधी पराभवाचे तोंड पहावे लागले नाही हे विशेष. 

1995 ला दुसऱ्यांदा पक्षाने दानवे यांना उमेदवारी दिली आणि दानवे दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले. युती सरकारच्या काळात विविध महामंडळावर देखील त्यांना संधी देण्यात आली होती. दिवंगत नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या सहवासात दानवे यांचे राजकारण अधिकच बहरत गेले. त्यांच्यातील संघटनात्मक गुण ओळखून प्रमोद महाजन यांनी त्यांना 1999 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जालन्यातून उमेदवारी दिली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी दिल्लीही सर केली. त्यानंतर सातत्याने सलग पाचवेळा खासदार म्हणून ते निवडून आले. विशेष म्हणजे लाखांचे मताधिक्‍य घेऊन त्यांनी हा पराक्रम केला. 


2014 च्या मोदी लाटेत रावसाहेब दानवे चौथ्यांदा जालन्यातून प्रचंड मतांनी निवडून आले. त्यांच्या सातत्याची दखल घेत दानवे यांचा राज्यमंत्री म्हणून केंद्रीय मंत्रीमंडळात समावेशही करण्यात आला. पण दानवे दिल्लीत फारकाळ रमले नाही. वर्षभरातच महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी विचारणा झाली आणि त्यांनी राज्यात काम करण्याला प्राधान्य देत केंद्रीय राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून मिळालेल्या संधीच सोन करत रावसाहेब दानवे यांनी आपल्या नेतृत्वाखाली पक्षाला ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला घवघवीत यश मिळवून दिले. राज्यातील नंबर एकचा पक्ष हा बहुमान देखील रावसाहेब दानवे यांच्यामुळेच भाजपला मिळाल्याचे त्यांचे विरोधकही मान्य करतात. पक्षीय पातळीवर राज्याचा गाडा हाकत असतांनाच रावसाहेब दानवे यांनी आपल्या मतदारसंघावर देखील पकड कायम ठेवली. दोन्ही पंचायत समित्या, खरेदी विक्री संघ, रामेश्वर सहकारी साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह तालुक्‍यातील बहुतांश सेवा सहकारी संस्था वीस वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहेत. 

दानवे यांनी आतापर्यंत लढवलेल्या पंचवीस पैकी चोवीस निवडणुका जिंकल्या आहेत. याचा उल्लेख ते वारंवार आपल्या भाषणांमधून करत असतात. संघटनात्मक कौशल्य, कार्यकर्त्यांशी सतत संपर्क, ग्रामीण भागाशी कायम ठेवलेली नाळ, प्रशासन हातळण्याची कला याचा देखील त्यांच्या यशात महत्वाचा वाटा आहे. राज्य आणि केंद्रातील नेत्यांशी उत्तम संवाद आणि संपर्काच्या जोरावर त्यांनी मतदारसंघात सहा हजार कोटींची विकासकामे खेचून आणली आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com