शिवसेनेचे एकेकाळचे  संताजी - धनाजी पक्के वैरी का झाले ?

Kadam-dalvi.
Kadam-dalvi.

दाभोळ : एकेकाळी कोकणातील शिवसेनेचे संताजी धनाजी म्हणून ओळखले जाणारया या दोन मित्रांमध्ये आता वितुष्ट आले आहे. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना दापोलीचे शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यात जाहीर कलगीतुरा सुरु झाला आहे . 

सूर्यकांत दळवी हे दापोलीचे 1990,  1995, 1999, 2004  आणि 2009  असे सलग पाच टर्म आमदार होते. 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेतील गटबाजीमुळे दळवींना राष्ट्रवादीच्या संजय कदम यांच्याकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला होता . तेंव्हापासून शिवसेनेच्या कोकणातील संताजी धनाजीची जोडी फुटली आहे . 

 पूर्वी रामदास कदम यांचा मतदारसंघ खेड होता .1990, 1995, 19999 आणि2004 मध्ये रामदास कदम खेडचे आमदार होते . मतदारसंघाच्या पुनर्रचनेत खेड मतदारसंघ राहिला नाही . तो गुहागर, दापोली आणि चिपळूणमध्ये विभागला गेला. त्यांनतर रामदास कदम गुहागरमध्ये गेले पण तेथे त्यांना 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या भास्कर जाधवांकडून पराभव पत्करावा लागला होता . आता भास्कर जाधव पुन्हा शिवसेनेत परत येत असल्याने एक वर्तुळ पूर्ण होत आहे . 

शिवसेनेने त्यांनतर रामदास कदम यांना विधान परिषदेवर घेतलेले आहे . रामदास कदमांना  सूर्यकांत दळवींनी दापोलीत येऊ  दिले नव्हते . गेल्या तीन चार वर्षात रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनी दापोलीत काम करण्यास सुरुवात केली आहे. रामदास कदम यांना आपल्या मुलाला दापोलीत उभे करायचे आहे. तर सूर्यकांत दळवींना स्वतःलाच पुन्हा एकदा दापोलीतून लढायचे आहे . 

योगेश कदम यांनी दापोली मतदारसंघात विकास कामांचा धडाका लावला आहे . रामदास कदम यांनी योगेश यांच्या पाठीशी सर्व सहकारी मंत्र्यांना सांगून मोठे बळ उभे केले आहे आणि विकासकामांसाठी निधीही मिळवून दिला आहे . योगेश कदम यांनी दापोलीत धडक मारल्यापासून  दळवी आणि कदम यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आहे .  तेंव्हापासून   दोघेही एकमेकावर जोरदार टीका करू लागले आहेत.

रामदास कदम जादूटोणा करतात 
 दापोली येथे सुर्यंकांत दळवी यांनी आज सोमवारी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम हे  भगत असून ते  जादूटोणा करणारे  असल्याचा  सनसनाटी आरोप केला .  रामदास कदम बंगाली लोकांना सोबत घेऊन फिरत असल्याचेही दळवी यांनी यावेळी सांगितले.

 

रामदास कदम जादूटोणा करत असल्याचे सांगत असताना दळवी म्हणाले , विधानसभेत विरोधी पक्ष नेता म्हणून निवड होताना त्यावेळी सर्व आमदारांचे व्हीप घेऊन जाण्यास शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी मला सांगितले होते. रामदास कदम यांना विरोधी पक्ष नेता करावे  म्हणून आपण सेनेच्या सर्व आमदारांना व्हीप बजावला होता. 

त्यावेळी मी रामदास कदम यांचेकडे गेलो असता त्यांनी मला एक माणूस सोबत दिला . मला वाटले तो त्यांचा मित्र आहे. त्याला घेऊन आत जा असे कदम यांनी मला सांगितले. त्यांचे सांगण्यानुसार मी विधानभवनात गेलो त्यानंतर त्या व्यक्तीने केबिन मध्ये १० ते १५ मिनिटे काहीतरी जादूटोणा केला. नंतर मला समजले तो जादूटोणा करणारा होता.

आम्ही दोघेही जेव्हा आमदार होतो तेव्हा रामदास कदम यांच्या जामगे येथील बंगल्याच्या  गच्चीवर अमावास्येच्या दिवशी जवळपास एक टेम्पो भरतील इतके कोहाळे आणण्यात आले होते . बंगाली जादूटोणा करणारे  लोक रात्रभर हे कोहळे तेंव्हा कापत होते असा  सनसनाटी आरोप  सुर्यकांत दळवी यांनी यावेळी केला .  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com