मध्यरात्री एकला फोन आला, तुम्ही उद्या मंत्रिपदाची शपथ घ्या ! - दादा भुसे

 मध्यरात्री एकला फोन आला, तुम्ही उद्या मंत्रिपदाची शपथ घ्या ! - दादा भुसे

मालेगाव : मंत्रिमंडळ विस्ताराच्या पूर्वसंध्येला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह आम्ही नाशिकला होतो. तेव्हा शपथविधी, मंत्री, त्याबाबतच्या सूचना ही सर्व सूत्रे त्याचवेळी हलत होती. यंदाच्या मंत्रिमंडळ विस्ताराची सर्व सूत्रे नाशिकमधून हलली. मी त्या दिवशी उत्सुकता, उत्कंठा अशा संमिश्र भावनांसह रात्रभर फोन घेऊनच झोपलो होतो. मध्यरात्री एकला शिवसेना भवनातून फोन आला. तुम्ही उद्या मंत्रिपदाची शपथ घ्याल का ? अन्‌ मी मंत्री झालो. असे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. 

मंत्री झाल्यावर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या नेते, कार्यकर्त्यांनी अत्यंत जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी शेकडो कार्यकर्ते जमले होते. यावेळी त्यांनी सगळ्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, मागच्यावेळी मला रात्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता. तुम्ही मंत्री होणार का ? अशी विचारणा त्यांनी केली होती. तेव्हा मी मंत्री झालो, यंदा सगळेच अनिश्‍चित होते. काहीच कळत नव्हते. मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये होते. मी पूर्णवेळ त्यांच्यासमवेत होतो. मंत्रिमंडळ विस्ताराविषयी विविध नेत्यांशी त्यांची चर्चा होत होती. विविध सूचना दिल्या जात होते. निरोप दिले जात होते. काय करायचे, कसे करायचे याचे नियोजन होत होते. अर्थात राज्याच्या मंत्रिमंडळाची सर्व सूत्रे नाशिकमधून हलत होती. सायंकाळी मुख्यमंत्री मुंबईला रवाना झाले. मी देखील त्यांच्याबरोबर गेलो. 

त्यानंतर मागीलवेळचा अनुभव लक्षात घेऊन मी अस्वस्थपणे फोन घेऊनच झोपलो. एक क्षण देखील फोन लांब होऊ दिला नाही. काय सांगावे कधी फोन येतो. तेव्हा आपण झोपललो असलो, फोन घेता आला नाही तर काय होणार? या अस्वस्थतेने फोनसह झोपलो. तेव्हा मध्यरात्री एकला शिवसेना भवन मधून ज्येष्ठ नेत्यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितले, "उद्या मंत्री म्हणून शपथ घ्या.' यंदा काय होणार याची उत्सुकता असतांना माझे राज्यमंत्री वरुन कॅबीनेट मंत्री असे प्रमोशन झाले होते. नाशिकला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले. त्याचा निश्‍चितच जनतेच्या विकासासाठी उपयोग होईल. याविषयी कोणीही शंका बाळगू नये. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजेंद्र भोसले, समता परिषदेचे धर्मा भामरे, कॉंग्रेसचे नगरसेवक नंदकुमार सावंत, रिपब्लिकन पक्षाचे भारत चव्हाण, माजी उपमहापौर सखाराम घोडके, उपमहापौर निलेश आहेर, ज्येष्ठ नेते मधुकर हिरे यांसह विविध नेते उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com