माजी आमदार दिलीप मोहिते यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

माजी आमदार दिलीप मोहिते यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

राजगुरूनगर : खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज खेड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांनी आज फेटाळला. 

 मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी, चाकण येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी, खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनाही संशयित आरोपी करण्यात आल्याने, त्यांनी  येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.  त्याबाबत काल सुनावणी झाली. मोहिते यांच्या बाजूने त्यांचे वकील ऍड. हर्षद निंबाळकर यांनी युक्तिवाद केला. तर सरकारच्या बाजूने सरकारी वकील अरूण ढमाले यांनी युक्तिवाद केला होता.

चाकणच्या हिंसाचाराच्या घटनेआधी काही दिवस हे कटकारस्थान करण्यासाठी, एक गुप्त बैठक झाली. तीत मोहिते होते. तसे काही साक्षीदारांचे जबाब आहेत, पण त्यांची नावे आता उघड करता येणार नाहीत. त्या जबाबांवरून आणि मोहिते यांच्या भाषणातील वक्तव्यावरून त्यांना या घटनेची पूर्वकल्पना होती, हे स्पष्ट होत आहे, म्हणून त्यांना जामीन देऊ नये, असा युक्तिवाद ढमाले यांनी केला होता. 

चाकण येथे सभास्थळावर इतर नेत्यांबरोबर मोहिते यांचेही भाषण झाले आणि त्यानंतर ते पुण्याला पीडीसीसी बँकेच्या बैठकीसाठी निघून गेले. त्यांच्या भाषणात त्यांनी लोकांना भडकविले तर नाहीच, उलट शांततेचे आवाहन केले. पोलिसांनीच दाखल केलेल्या एफआयआरमध्ये मोहितेंबाबत काहीही उल्लेख नाही. त्यानंतर जे ८३ आरोपी अटक केले त्यांच्या जाबजबाबामध्ये मोहितेंचा उल्लेख नाही. आता अचानक एक वर्षानंतर मोहिते आरोपी असल्याचा पोलिसांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी कटकारस्थानाचे कलम वाढवून मोहितेंना आरोपी केले. त्यामागे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा छळ करण्याचा उद्देश आहे. म्हणून त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा, असा युक्तिवाद निंबाळकर यांनी यापूर्वीच्या सिद्धराम म्हेत्रे आणि अन्य दाव्यांचा उल्लेख करून केला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com