छत्रपती घराण्याची जमीन विक्रीवर राजमाता कल्पनाराजे व खासदार उदयनराजेंना न्यायालयाचा निर्बंध 

छत्रपती घराण्याची जमीन विक्रीवर राजमाता कल्पनाराजे व खासदार उदयनराजेंना न्यायालयाचा निर्बंध 

सातारा  : छत्रपती घराण्याच्या राजकीय सरंजाम इनामवर्ग 1 सत्ता प्रकारच्या सर्व जमिनी आणि देवस्थान इनाम हक्‍काच्या सर्व जमिनी खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले यांना शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय विकता येणार नाहीत. तसेच विजयसिंहराजे भोसले यांनी दाखल केलेल्या दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत घराण्याच्या सर्वप्रकारच्या जमिनी विक्री करु नयेत, त्यावर इतर कोणाचा हक्‍क निर्माण करु नये अशी तुर्तातुर्त ताकीद वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधिश श्रीमती के. एफ. एम. खान यांनी दिली. 

याबाबत खासदार उदयनराजे यांचे चुलते विजयसिंहराजे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजयसिंहराजे भोसले यांनी येथील दिवाणी न्यायालयात उदयनराजे व राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या विरोधात 2003 मध्ये दावा दाखल केला आहे.

त्यात महाबळेश्‍वर, लिंब, बावधन, बोंडारवाडी, कोडोली, गोडोली, आरफळ यासह छत्रपती घराण्याच्या राजकीय सरंजाम इनाम वर्ग 1 सत्ताप्रकारच्या सर्व जमिनी आणि प्रतापगड, शिंगणापूर यासह सर्व देवस्थान इनाम हक्‍काच्या सर्व जमिनी छत्रपती घराण्याच्या सामाईक मालकीच्या आहेत, असे जाहीर होऊन मिळावे. सदर जमिनी अहस्तांतरणीय, अविभाजीय आहेत, असे जाहीर होऊन मिळावे.

सदर मिळकती छत्रपती घराण्याच्या सरंजाम इनाम सत्ताप्रकार व देवस्थान इनाम सत्ताप्रकाराच्या सर्व जमिनी उदयनराजे व कल्पनाराजे यांनी महाराष्ट्र शासन व विजयसिंहराजे व त्यांचे बंधू अभयसिंहराजे भोसले, शिवाजीराजे भोसले यांच्या संमतीशिवाय 
कोणासही विक्री अथवा अन्यप्रकारे तबदील करु नयेत.

स्वत: अथवा कुळ, एजंट अगर मुखत्यार मार्फत करु नयेत अशी निरंतर ताकीद मागणी  करण्यासाठी दावा दाखल केला आहे. 
या विशेष दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत उदयनराजे व राजमाता  कल्पनाराजे यांनी स्वत: अगर इतरांमार्फत सातारा छत्रपती घराण्याच्या राजकीय सरंजाम इनाम वर्ग 1 व देवस्थान इनाम सत्ताप्रकारच्या कोणत्याही मिळकती अन्य कोणालाही गहाण, दान, लीज, लीन, बक्षिस, खरेदी- विक्री अगर अन्यप्रकारे हस्तांतर करु नयेत व त्याच्या नोंदी महसूल रेकॉर्डला करु नयेत.

अशी तुर्तातुर्त ताकीद देण्यासाठी विजयसिंहराजे यांनी अर्ज केला होता. या अर्जाची सुनावणी न्यायाधीश श्रीमती खान यांच्यासमोर झाली. या अर्जावर न्यायालयाने 20 मे रोजी निर्णय दिला.

विजयसिंहराजे भोसले यांची दाव्याच्या दरम्यानची तुर्तातुर्त ताकीदीची मागणी मंजूर केली आहे. सातारा छत्रपती घराण्याच्या राजकीय सरंजाम इनाम व देवस्थान इनाम सत्ताप्रकारच्या सर्व 
जमिनीमध्ये विजयसिंहराजे व त्यांचे बंधू (कै.) अभयसिंहराजे भोसले व शिवाजीराजे भोसले यांना हक्‍क आहे.

सर्व मिळकती शासनाने फॅमिली ग्रॅंड म्हणून दिल्या आहेत. या मिळकती शासनाच्या पुर्व परवानगीशिवाय विक्री करता येत नाहीत, असे स्पष्टपणे धरुन उदयनराजे व कल्पनाराजे यांना सदर जमिनी शासनाच्या पुर्व परवानगीशिवाय विकता येणार नाहीत. म्हणून दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत सदर जमिनींची विक्री अथवा जमिनीवर इतर कोणाचाही हक्‍क निर्माण करु नये, अशी तुर्तातुर्त ताकीद न्यायालयाने दिली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com