न्यायालयाचा निर्णय : सहा तरुणांना दोन महिने वॉटरकपच्या कामावर श्रमदानाची शिक्षा - Court asks six youths to work for water cup or go to prison | Politics Marathi News - Sarkarnama

न्यायालयाचा निर्णय : सहा तरुणांना दोन महिने वॉटरकपच्या कामावर श्रमदानाची शिक्षा

सरकारनामा
शुक्रवार, 10 मे 2019

सहाही तरुणांना दोषी ठरवीत जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी पेंडगाव येथे सुरू असलेल्या वॉटरकप स्पर्धेतील जलसंधारण कामावर दोन महिने किंवा काम संपेपर्यंत श्रमदान आणि पाच हजार रुपये दंड, तसेच श्रमदान केले नाही तर एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.

बीड  : विनाक्रमांकाच्या ट्रॅकरद्वारे अवैध वाळू वाहतूक रोखणाऱ्या मंडलाधिकारी व कोतवालाला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या सहा तरुणांना पेंडगाव (ता. बीड) येथे सुरू असलेल्या पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेच्या कामावर दोन महिने किंवा काम संपेपर्यंत श्रमदान करण्यासह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवारी (ता. 10) जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी सुनावली. 

चार एप्रिल 2017 मध्ये गेवराई तालुक्‍यातील कोल्हेर परिसरात एका विनाक्रमांकाच्या ट्रॅक्‍टरमधून वाळूची वाहतूक होत होती. मंडलाधिकारी सुनील तांबारे व कोतवाल विठ्ठल रामराव सुतार यांनी हा ट्रॅक्‍टर पकडला. यामुळे संबंधित सहा तरुणांनी तांबारे व सुतार यांना मारहाण केली. याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात वरील सहा जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद झाला. पोलिस निरीक्षक के. एच. पवार यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

नाही तर एक वर्ष सश्रम कारावास
मारहाण प्रकरणात आठ साक्षीदार तपासण्यात आले. यानंतर सहाही तरुणांना दोषी ठरवीत जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी पेंडगाव येथे सुरू असलेल्या वॉटरकप स्पर्धेतील जलसंधारण कामावर दोन महिने किंवा काम संपेपर्यंत श्रमदान आणि पाच हजार रुपये दंड, तसेच श्रमदान केले नाही तर एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. तरुणांचे वय आणि त्यांच्या भवितव्याचा विचार करून सामाजिक भावनेतून हा निकाल देण्यात आला.

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख