Corrupt people joining BJP for protection : Patangrao Kadam | Sarkarnama

भानगडबाज कवचकुंडलासाठी भाजपमध्ये :पतंगराव कदम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

कॉंग्रेसमधून अनेकजण भाजपच्या गोटात जात असल्याबद्दल बोलताना आमदार कदम म्हणाले, ""ज्यांच्या भानगडी आहेत ते कवचकुंडलांसाठी तिकडे पळत आहेत. मात्र आज ना उद्या चोर लोक सापडल्याशिवाय राहणार नाहीत. काहीजण काही तरी मिळेल या अपेक्षेने तिकडे जात आहेत. तिकडे ते किती दिवस राहतील सांगता येत नाही.'' 

सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेसव कॉंग्रेसमधून भाजपमध्ये जाणारे दोन प्रकारचे लोक आहेत. एक ज्यांनी भानगडी केल्या आहेत ते कवचकुंडलासाठी पळत आहेत, तर दुसरे काय तरी मिळेल या अपेक्षेने जात आहेत, असा आरोप माजी मंत्री आमदार पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. राज्य सरकार सक्षम असूनही शेतकऱ्यांची कर्जमाफीबाबत उदासीन आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 

कदम म्हणाले, "गेल्या दोन वर्षांत साडेनऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी संकटात सापडला आहे. त्याला कर्जातून मुक्त केल्याशिवाय पर्याय नाही. कर्जमाफी करणे हीच तातडीची मदत आहे. आमचे सरकार असताना 71 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. सरकार कर्जमाफी करण्यास तयार नाही म्हणूनच सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन अधिवेशनावर बहिष्कार घातला आणि संघर्ष यात्रेत सामील झाले. आपल्या राजकीय कारकीर्दीत प्रथमच सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत.'' 

ते म्हणाले, की कॉंग्रेस राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांनी सरकारच्या विरोधात संघर्ष यात्रा सुरू केली आहे. त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसरा टप्पा 15 एप्रिलपासून सुरू होत आहे. बुलडाण्यातून ही यात्रा सुरू होणार असून तिचा समारोप 18 रोजी ठाण्यात होणार आहे. या यात्रेचा तिसरा टप्पा कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात आहे. शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. त्यांना कर्जातून मुक्त केल्याशिवाय पर्याय नाही. गावोगावी शेतकऱ्यांची एकच मागणी दिसते कर्जमाफी झाली पाहिजे. 

कॉंग्रेसमधून अनेकजण भाजपच्या गोटात जात असल्याबद्दल बोलताना आमदार कदम म्हणाले, ""ज्यांच्या भानगडी आहेत ते कवचकुंडलांसाठी तिकडे पळत आहेत. मात्र आज ना उद्या चोर लोक सापडल्याशिवाय राहणार नाहीत. काहीजण काही तरी मिळेल या अपेक्षेने तिकडे जात आहेत. तिकडे ते किती दिवस राहतील सांगता येत नाही.'' 

सांगली मनपा एकत्र लढवणार 
जिल्हा परिषदेला एकी झाली नाही त्याची फळे भोगतोय. पुढील निवडणुका राष्ट्रवादी कॉंग्रेलला सोबत घेऊन एकत्रित लढणार आहे. सांगली महापालिका निवडणुकीसाठी "राष्ट्रवादी'शी आघाडी असेल. 

कर्नाटकला पाणी नाही 
कर्नाटकला पाणी देण्यास विरोध आहे. त्यांना दोन टीएमसी पाणी दिले आहे. त्या बदल्यात एक टीएमसी जतला आणि एक टीएमसी अक्‍कलकोटला देण्याची अट घातली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लेखी पत्र दिले आहे, असे कदम यांनी सांगितले. 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुली दत्तक 
औरंगाबाद येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या पुनर्वसन केंद्राला संघर्ष यात्रेदरम्यान भेट दिली. तेथील मुलींशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. बीड जिल्ह्यातील अशा दोन मुलींना दत्तक घेतले आहे. वैभवी ज्ञानेश्‍वर सूर्यवंशी (वर्धापूर) आणि नंदिनी सखाराम घुगे (परळी) या दोन मुलींचा सर्व खर्च करणार असल्याची माहिती कदम यांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख