# Coronaeffect Corona lowers state power demand, shutting down 14 sets of generators | Sarkarnama

# Coronaeffect कोरोनामुळे राज्याची विजेची मागणी कमी, महानिर्मितीचे 14  संच बंद

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 मार्च 2020

उन्हाळ्यात 20 ते 22हजार मागणी रहात असतांना सध्याच्या वातावरणामुळे राज्याची मागणी आज सायंकाळी 12 हजार 400 मेगा वॅट वर आली होती.

नाशिक  : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहतीतील उद्योग बंद असल्याने विजेची मागणी सुमारे 10 हजार मेगावॅट ने कमी झाल्याने 14 संच झिरो शेड्युलमध्ये बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक, परळी व भुसावळ या तीन वीज केंद्राची वीज निर्मिती शून्यावर आली आहे.

'कोरोना' विरोधातील उपाययोजना म्हणून अनेक निर्णय शासनाने घेतले आहेत. यामध्ये बहुतांश उद्योग, कारखाने, संस्था, दुकाने बंद आहेत. व्यवसायिक संस्थात जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य आस्थापनेवर मर्यादा आहेत.

नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे बहुतेक दैनंदिन कामकाज बंद आहेत. त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. त्यात प्रामुख्याने वीजेच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे. 

कोरोना व्हायरसचा जगभर धुमाकूळ सुरू असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉक डाऊन करण्यात आले आहे. खासगी सह सरकारी उद्योग व कंपन्या बंद चा परिणाम राज्यातील वीजेच्या मागणीवर झाला असून उन्हाळ्यात 20 ते 22हजार मागणी रहात असतांना सध्याच्या वातावरणामुळे राज्याची मागणी आज सायंकाळी 12 हजार 400 मेगा वॅट वर आली होती.

 त्यामुळे तात्काळ खापरखेडा २१० मेगा वॅट च्या संच 1 व 2 ला तसेच नाशिक 4 ला रेजर्व शट डाऊन देण्यात आले. 2 दिवसाआधी परळी 7-8 व 9 ला टप्याटप्याने झिरो शेड्युल देण्यात आले.

कंपन्या बंद असल्यामुळे जास्तीत जास्त नागरिक घरी असतांना घरगुती वीजेची मागणी काहीअंशी वाढली असली तरी 22 हजारावरून मागणी साडे बारा हजारावर आल्याने कोराडी संच 6 व 7, भुसावळ 3-4 व 5 नाशिक 3 व 4 परळी 6 , 7 व 8, व खापरखेडा येथील 210 चे चार संचाना झिरो शेड्युल देण्यात आले असल्याने फक्त 500 मेगा वॅट चा संच सुरू आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख