corona police action innocent people attical about maharastra police | Sarkarnama

ज्यांना दंडुके हाणता "ती' जनावरं नव्हे तर माणसं आहेत ! 

प्रकाश पाटील 
गुरुवार, 26 मार्च 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना उद्देशून जे भाषण केले आहे तेही थोडे पोलिसांनी ऐकले पाहिजे. नियम मोडणाऱ्यांवर हवे तर गुन्हे दाखल करा. त्यांना तुमच्या भाषेत समजावा हे योग्य ठरेल. पण, जनावरांसारखे धोपटून काढू नका. पोलिसांनीही थोड सबुरीने घ्यायला हवे. 

निसर्गापुढे सर्व समान असतात. तेथे कोणी मोठा-छोटा नसतो. आपत्ती मग ती कोणतीही असो. भूकंप, त्सुनामी असेल किंवा आजचा भयावह कोरोना असेल. होत्याचं नव्हतं करून टाकतात जिवघेणी संकटं. कोण, कुठला कोरोना ? आपल्या देशात घुसखोरी करतो काय ? 130 कोटी जनतेच्या मनात धडकी भरवतो काय ? प्रत्येकाला घराचा उंबरठाही ओलांडून देत नाही. इतकी दहशत याने निर्माण केली. 

ंसंकट कधी सांगून येत नाही म्हणून घाबरण्याचेही कारण नाही. संकट ही संधी मानून त्याच्याशी लढलं पाहिजे. आज अभिमानाने म्हणावे लागेल की प्रत्येक भारतीय लढतोय. कोरोनाला एकदिवस तो पळवेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपेंपर्यंत सर्वजण लोकांची काळजी घेत आहे. राजकारण बाजूला सारून आपण एक झालो आहोत. गाव, तालुका, जिल्हा, राज्यच नव्हे तर देशावरील संकटात माणसही सैरभर झाली आहेत. 

हे सर्व कंट्रोल करताना मोठे आव्हान पोलिसांपुढेही उभे आहे. लोकांना घरात बसा सांगूनही काही लोक ऐकत नाही. अजितदादांनी तर लष्कर तैनात करण्याची वेळ आणू नका असा गंभीर इशाराच लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना दिला आहे.

म्हणजे कोरोनाचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागतील हे काही मंडळींच्या अजूनही लक्षात येत नाही. वास्तविक अशा मंडळींना पोलीस  धडा शिकवित आहेत. तसे व्हिडिओही पुढे येत आहे. जर कोरोनाचा झपाट्याने फैलाव झाला तर आपल्याकडे दाणादाण उडेल हे ही खरेच आहे. 

आपल्याकडची आरोग्य व्यवस्था म्हणजे काय आहे हे सांगण्याची गरज नाही. लोकसंख्या आणि त्या तुलनेत असलेली खासगी किंवा सरकारी दवाखाने, रूग्णालये किती ? हा सर्वात मोठा प्रश्‍न आहे. यापूर्वीही देशावर संकटे आली अशावेळी काय होते.

आपत्ती व्यवस्थानाचे कसे बारा वाजतात याचा अनुभवही आपल्या पाठिशी आहे. त्यामुळेच वेळीच दक्षता घेतली तर त्याचा फायदा होतो हे ही कळून चुकले आहे. म्हणूनच आजतरी लोक काळजी घेताना दिसतात. उत्तम प्रतिसाद आहे. त्याचे स्वागतच केले पाहिजे. 

एकीकडे असे आशादायक चित्र असताना दुसरीकडे राज्यात पोलीस दंडुक्‍याचा धाक दाखवत आहेत. लोकांना चोपून काढत आहेत. दिसला रे दिसला की लाठ्याकाठ्याचे अंगावर वळ उठवित आहेत. जनावरांप्रमाणे पाठ फोडून काढत आहे हे चित्र संताप आणणारे आहे.

परवा सातारा जिल्ह्यात तर एका माजी सैनिकालाच दहा पंधरा पोलिसांनी फोडून काढले. जो जवान देशासाठी प्राणपणाने लढतो. त्याची साधी विचारपूस न करता दंडुका कसा काय उगारला जावू शकतो. अशा संकटात पोलिसांचा धाक निश्‍चितपणे हवा. याबाबत दुमत असण्याचे कारणही नाही. शेवटी आज जे काही चालले आहे, ते लोकांसाठीच आहे. हे खरे असले तरी अशा संकटात सर्वाधिक झळ बसते ती गोरगरीब माणसांना. 

ज्याचं तळहातावर पोट आहे त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी काय करावं. घरातील भुकेला लेकराबाळांचा आवाजही सहनशिलतेच्या पलिकडचा आहे. दुकानात, भाजीपाला, दुध आणण्यासाठी तरी जायचे की नाही याचा सोक्षमोक्ष मायबाप सरकारने लावला पाहिजे. सरकारने आदेश काढला रे काढला की पोलीस  दंडुका उचलायला तयार असतात हे योग्य होणार नाहीत.

श्रीमंत, मध्यवर्गीय मंडळींना असल्या लॉकडाऊनचा तातडीने काही फरक पडत नाही. कारण त्यांच्या घरात दर महिन्याभराचे सामानसुमान भरलेले असते. मात्र जो कष्टकरी आहे. ज्याचे हातावर पोट आहे. रोज कमविले तर चूल पेटते अशांची अशा संकटात काळजी घ्यायला हवी त्याची जवाबदारी मायबाप सरकार, राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांच्यावर आहे. 

मुद्दाम कोणी घराबाहेर पडत नाही. काही अडचण निर्माण झाली तरच तो बाहेर येतो. अशा वेळी पोलिस त्याचे काही ऐकून घेतच नाहीत. धोपटायला सुरवात करतात याची अनेक उदाहरणे पाहण्यास मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना उद्देशून जे भाषण केले आहे तेही थोडे पोलिसांनी ऐकले पाहिजे. नियम मोडणाऱ्यांवर हवे तर गुन्हे दाखल करा. त्यांना तुमच्या भाषेत समजावा हे योग्य ठरेल. पण, जनावरांसारखे धोपटून काढू नका. काही मंडळी तर गोळ्या घालण्याची भाषा करतात ते ही समर्थनीय नाही. 

गेल्या काही दिवसापासून सर्वत्र बंद आहे. वस्तुचे भाव आकाशाला भिडले आहेत. खिशात पैसे नाहीत. गरज भागत नाही अशावेळी गरजू माणसांनी जायचं कुठं ! काय करायचं ! आपल्याकडे अन्नधान्य, औषधे, भाजीपाला गरीबांच्या झोपडीपर्यंत पोचविण्याची यंत्रणा आहे का ? याचंही उत्तर दिलं पाहिजे. कोरोना डेंजर आहे हे खरं पण, माणंसाचा छळ करू नका. थोडं सबुरीनेही घेण्याची गरज आहे. 

तसेच लोकांनीही कोरोना जीवघेणा आहे हे लक्षात घ्यावे. पोलिस, डॉक्‍टर्स, आरोग्य विभागाचे कर्मचारी हे जीवावर उदार होऊन आपल्याचसाठी रस्त्यावर आहे. संतापाच्या भरात त्यांच्यावरही हात उचलू नका. पॅनिक होऊन चालणार नाही. देशावरील संकटाला प्रत्येकाने हातात हात घालून सामोरे गेले पाहिजे. "हम होंगे कामयाब ' चा निर्धार केला पाहिजे. 

लोकांना कंट्रोल करायला पोलिस समर्थ आहे. लोक ऐकत नाहीत असे नाही. अकरा कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात थोडे इकडेतिकडे होणारच. त्यामुळे लष्कराची तर मुळीच गरज नाही. बंदुकीच्या टोकाचा धाक दाखवून लोकांना घरात बसविणे योग्य होणार नाही.

लोक जागृत आहेत. शहाणे आहेत. त्यांनाही चांगलं वाईट कळतं. काहीजण चुकत आहेत त्यांनाही समजून घेतानाच कोरोना राक्षस आहे तो आपणास गिळायला निघालाय हे त्यांना धाकाने नव्हे तर प्रेमाने लक्षात आणू द्या ! हीच पोलिसांकडून अपेक्षा ! 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख