Corona Freed Couple Shared Their Experience | Sarkarnama

'कोरोना'ने 'त्यांना' दिली एकमेकांना समजून घेण्याची संधी!

ज्ञानेश सावंत
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोनाच्या आवाक्यात सापडूनही त्यावर मात केलेले पुण्याचं दाम्पत्य आज नायडू हाॅस्पीटलमधून घरी गेलं. त्यानंतर त्यांनी क्वारंटाईनच्या काळातल्या पाॅझिटिव्ह गोष्टी लोकांसमोर मांडल्या

पुणे  : मी आणि ती पंचवीस वर्षापूर्वी बोहल्यावर चढलो; इतक्या वर्षात आम्ही कधीच सलग पंचवीस दिवसही एकमेकांसह मुलांसमवेत घालविले नाहीत. कारणही तसं. माझी नोकरी. मला परराज्यांत जावं लागायचं तेव्हा, 'ही' (म्हणजे माझी बायको समजून घ्यायची, पण मुलांचे काय?)... पण, आम्हाला कोरोना झाल्याचे उघड झालं; मग, ती अन मी डॉ. नायडूतल्या एका खोलीत बंद झालो.

अर्थात, आमच्या पोटातल्या भीतीचा गोळ्याचा आकार वाढत होता अन आम्ही दोघे एकमेकांना धीर देत होतो...आम्हा दोघांच्या पोटातला भितीचा गोळा कुठं कमी झालं नाही, तोवरच आमच्या पोटचा गोळा; म्हणजे माझी लेक कोरोना पॉझिटिव्ह सापडली...तिथं तर अंगच गळून पडलं! पण पुढच्या १७ दिवसांत लेकीनं सावरलं अन आम्ही स्वतःला आवरलं....कोरोनाच्या आवाक्यात सापडूनही त्यावर मात केलेले पुण्याचं दाम्पत्य कोरोनाची भीती न मांडता या काळातल्या पॉझिटिव्ह' गोष्टीच सांगत होतं.....

आठवडाभर संपर्कात राहिलेल्या त्यांच्या मुलाच्या तपासणीचा रिपोर्ट मात्र, 'निगेटिव्ह' आला. तरीही त्यालाही १४ दिवस डॉ. नायडूत राहावे लागले. तेव्हापासून हे चौघेजण याच हॉस्पिटलमध्ये होते. या सगळ्याजणांवर सलग सतरा दिवस उपचार झाल्यानंतर ते बरे झाले ; या दाम्पत्याच्या शेवटच्या टप्प्यातील दोन्ही अहवाल 'निगेटिव्ह' आले आणि त्या गुडपाडव्याच्या दिवशी म्हणजे, बुधवारी दुपारी त्यांना घरी सोडण्यात आले. मुलांना उद्या सोडण्याची आशा त्यांना आहे. "गेल्या सतरा दिवसांत आम्ही एकमेकांना वेळा दिला. मित्रांनी दिलेल्या १२ पुस्तकांपैकी ६ पुस्तके आम्ही वाचली. हा काळ आम्ही छान घालविला. तेव्हा महापालिकेच्या डॉक्टरांची मोठी मदत मिळाली," हेही सांगायला दोघं विसरली नाही.

या दाम्पत्याला सुरवातीला एका खोली ठेवण्यात आले. तेव्हा त्यांची लेक मात्र, पाच-सहा फूट अंतरावरील एका खोलीत होती. या काळात ते एकमेकांना खोलीच्या दरवाज्याच्या काचेतून पाहायचे आणि जेवण कर, वाचन कर हे इशाऱ्यातून सांगायचे. सातव्या दिवशी मात्र तिघेही जनरल वॉर्डमध्ये आले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख