मी विल पॉवर'मुळे झालो कोरोनामुक्त....तांबव्यातील युवकाचे मनोगत; अफवा न पसरवण्याचे आवाहन - Corona Free Youth from Karad Appeals people not to Spread Rumors on Social Media | Politics Marathi News - Sarkarnama

मी विल पॉवर'मुळे झालो कोरोनामुक्त....तांबव्यातील युवकाचे मनोगत; अफवा न पसरवण्याचे आवाहन

हेमंत पवार 
सोमवार, 20 एप्रिल 2020

मित्रांनो रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्‍टर, नर्स, त्यांचे कर्मचारी 24 तास काम करतात. त्यावेळी रुग्णांना दिलासा देणे, हेही त्या काळात औषधाएवढेच महत्त्वाचे असते. मात्र, अशातच सोशल मीडियावर अफवा पसरवल्या तर मनाचे खच्चीकरण होते अशा भावना कोरोनातून मुक्त झालेल्या युवकाने व्यक्त केल्या आहेत

कऱ्हाड : मित्रांनो रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्‍टर, नर्स, त्यांचे कर्मचारी 24 तास काम करतात. त्यावेळी रुग्णांना दिलासा देणे, हेही त्या काळात औषधाएवढेच महत्त्वाचे असते. मात्र, अशातच सोशल मीडियावर अफवा पसरवल्या तर मनाचे खच्चीकरण होते. हे मी भोगले आहे. त्यासाठी अफवा न पसरवता रुग्णांना उपचारावेळी मॉरल सपोर्ट करा, ही माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. डॉक्‍टरांच्या सहकार्याने 'विल पॉवर'मुळे मी बरा झालो आहे, असा विश्वास तालुक्‍यात प्रथम कोरोनामुक्त झालेल्या तांबव्यातील युवकाने येथे व्यक्त केला.

कोरोनाच्या वेदना मी भोगल्या आहेत. त्या इतरांच्या वाट्याला येऊ नयेत, हीच माझी भावना आहे. या लढाईत माझी मदत लागली तर मी 24 तास तयार आहे. आरोग्य विभाग, प्रशासनाने मला या लढाईसाठी केव्हाही हाक मारावी, अशीही इच्छा त्याने व्यक्त केली.

क्वारंटाईनच्या काळात अनेक बरेवाईट अनुभव

कऱ्हाड तालुक्‍यात पहिल्यांदाच तांबव्यातील युवक कोरोनाबाधित असल्याचे त्याच्या रिपोर्टवरून स्पष्ट झाले. प्रशासनासह आरोग्य यंत्रणा धास्तावली होती. मात्र, त्यांनी न डगमगडता थेट उपाययोजना राबवून योग्य ती कार्यवाही केली. संबंधित युवकावर येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यादरम्यान त्याच्या कुटुंबातील सर्वांसह त्याच्या संपर्कामध्ये आलेल्या मित्रांना आणि नातेवाईकांना तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. कुटुंब एकीकडे, तो दुसरीकडे असे 14 दिवस त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काढले. त्या दरम्यान त्यांना अनेक बरे-वाईट अनुभव आले. 

अखेर लढाई जिंकली

मात्र, या जगण्या-मरण्याच्या लढाईत त्याने विजय मिळवला. या लढाईतून तो काही धडेही शिकला आहे. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला, "मी मुंबईवरून 23 मार्च रोजी आलो. तीन दिवस व्यवस्थित होतो. त्यानंतर त्रास झाल्यानंतर खासगी डॉक्‍टरांकडे तपासणीसाठी गेलो. दोन दिवस बरे वाटले. त्यानंतर पुन्हा अंग दुखू लागले. त्यानंतर मला खोकला सुरू झाला. त्यामुळे मला शंका आली होती. मी कृष्णा रुग्णालयात दाखल झालो. माझा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. कऱ्हाड तालुक्‍यातील पहिलाच रुग्ण असल्यामुळे सर्वच गांगरून गेले. मी ही घाबरलो होतो. आयसीयुत माझ्यावर डॉक्‍टरांनी उपचार सुरू केले. त्यानंतर तीन दिवस खूप त्रास झाला. मला जेवण जात नव्हते. तब्येत खूप खराब झाली. मनात वाईट विचारही आले. मात्र, डॉक्‍टर, कुटुंबीय, माझे साहेब, अधिकारी, मित्र यांनी मला दिलेल्या धीरामुळे मी त्यातून सावरलो. त्यादरम्यान काही वाईट प्रसंगही आले. मात्र, त्यावर पांघरूण घालून मी 'मॉरल सपोर्ट'वर बरा झालो,''

काही जणांनी पसरवले होते सोशल मिडियावर अफवांचे मेसेज

तो पुढे म्हणाला, ''माझ्यावर उपचार सुरू असताना काही जणांनी सोशल मीडियावर अफवांचे मेसेज पसरवले होते. मित्रांनो हे बरोबर नाही. जगण्या-मरण्याच्या लढाईत चांगले चार शब्दच माणसाला तारतात, हे मी अनुभवलेले आहे. त्यामुळे उपचार सुरू असताना तुम्हाला चांगले बोलता नाही आले तरी वाईट अफवांचे मेसेज पसरवू नका, ही माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. कोरोनाच्या वेदना मी भोगल्या आहेत. त्या इतरांच्या वाट्याला येऊ नयेत, हीच माझी भावना आहे. या लढाईत माझी मदत लागली तर मी 24 तास तयार आहे. आरोग्य विभाग, प्रशासनाने मला या लढाईसाठी केव्हाही हाक मारावी.''

चिमुरड्यामुळे सर्वांच्याच डोळ्यात पाणी

तांबव्यातील कोरोनातून बऱ्या झालेल्या युवकाला साडेचार वर्षांचा मुलगा आहे. संबंधिताला कोरोना झाल्याने मुलाच्या तपासणीकडे साऱ्यांचे डोळे लागले होते. विशेष म्हणजे त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सर्वांनी टाकला. मात्र, त्यानंतर त्याला तब्बल 16 दिवस वडिलांविना चुलते, चुलती, आजी-आजोबांबरोबर राहावे लागले. वडिलांना भेटण्यासाठी त्याच्या मनाची चाललेली तगमग, त्याच्याकडून विचारले जाणारे प्रश्न ऐकू नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी येत होते. ही आठवण आजही त्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरली आहे
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख