वडिलांचा कोरोनाने मृत्यू : कोरोनाग्रस्त मुलाचा अंत्ययात्रेला जाण्यासाठी गोंधळ; सारेच होते धोक्यात

शासकीय नियमानुसार बाधित व्यक्तीला विलगीकरण कक्षातून बाहेर जाता येत नाही. त्याला वैद्यकीय यंत्रणा, पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो समजण्याच्या स्थितीत नव्हता. तो युवक कक्षाबाहेर आला व त्याने रुग्णालयाच्या आवारात असलेल्या वाहनांना व ठिकठिकाणी हाताने स्पर्श केला.
corona 11
corona 11

धुळे : चक्करबर्डीतील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल एका "कोरोना'ग्रस्त युवकाने आज धिंगाणा घातला. "कोरोना'ग्रस्त वडिलांच्या अंत्ययात्रेला जाण्यासाठी त्याने काल (ता. 23 मार्च) अर्धा ते पाऊण तास हा प्रकार केला. त्याला आवर घालताना पोलिसांसह इतर यंत्रणेची दमछाक झाली. दरम्यान, यामुळे महापालिकेच्या यंत्रणेलाही हा संपूर्ण परिसर सॅनिटाइझ करण्यासाठी कसरत करावी लागली.

शहरातील "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्णांवर येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातीलच एका "पॉझिटिव्ह' युवकाने आज दुपारी गोंधळ घातला. त्यामुळे यंत्रणा त्याला नियंत्रणात आणण्यासाठी हैराण झाली होती. संबंधित कोरोना बाधित युवकाच्या गजानन कॉलनी व तिरंगा चौक परिसरात राहणाऱ्या 43 वर्षीय वडिलांचा कोरोनामुळे आज सकाळी साडेनऊला मृत्यू झाला. त्यांच्या अंत्ययात्रेला जाण्यासाठी कोरोनाबाधित युवकाने अट्टहास धरला.

शासकीय नियमानुसार बाधित व्यक्तीला विलगीकरण कक्षातून बाहेर जाता येत नाही. त्याला वैद्यकीय यंत्रणा, पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो समजण्याच्या स्थितीत नव्हता. तो युवक कक्षाबाहेर आला व त्याने रुग्णालयाच्या आवारात असलेल्या वाहनांना व ठिकठिकाणी हाताने स्पर्श केला. या स्थितीमुळे नर्स, पोलिस, अन्य कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. संरक्षक पीपीई ड्रेस परिधान केलेले डॉक्‍टर, वॉर्ड बॉय त्या युवकाला पकडण्यासाठी धजावत नव्हते. पोलिसांकडे संरक्षक पीपीई ड्रेस नसल्याने त्यांना दूर अंतरावर राहणे भाग पडत होते. तरीही त्यांनी त्या युवकाला समजून सांगण्याचा बराच प्रयत्न केला.

अखेर पोलिसांनी त्या युवकाची समजूत काढण्यासाठी जुन्या "सिव्हिल'मध्ये "क्वारंटाइन' असलेले आमदार डॉ. फारुक शाह यांना साकडे घातले. त्यांनी दूरध्वनीवरून त्या युवकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तो असफल ठरला. शेवटी आमदार शाह सर्वोपचार रुग्णालयात पोहोचले. त्यांच्यासह युवकाने संरक्षक पीपीई ड्रेस परिधान करून एका वाहनातून सोबत अंत्यसंस्काराचे स्थळ गाठले. वडिलांचा दफनविधी पार पडल्यावर शोकाकुल युवक व आमदार रुग्णालयात परतले.

दरम्यान, या प्रकारानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाला हा संपूर्ण भाग सॅनिटाइझ करण्यासाठी संपर्क साधण्यात आला. लगेचच महापालिकेचे पथक तेथे गेले व पथकाने तेथे संबंधित कक्षासह ज्या-ज्या ठिकाणी तो रुग्ण फिरला होता, ज्या ठिकाणी त्याने स्पर्श केला होता तो संपूर्ण भाग सॅनिटाइझ केला. पथकाने कोरोनाग्रस्ताचे शव ज्या ऍम्ब्युलन्समधून अंत्यविधीसाठी नेण्यात आले, ती ऍम्ब्युलन्स तसेच जुन्या सिव्हिलमधील काही 108 क्रमांकाच्या ऍम्ब्युलन्सही सॅनिटाइझ केल्या. दरम्यान, कंटेन्मेंट झोनमधील तिरंगा चौक, गजानन कॉलनी आदी भागातही महापालिकेकडून फवारणी करून हा परिसर सॅनिटाइझ करण्याचे काम सुरू होते.

नजर ठेवून आहोत : पंडित
या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी सांगितले, की वेळ अवघड आहे. जगातील कुणीही मनुष्य म्हणून विचार केला तर वडिलांचे अनपेक्षित निधन होणे हे क्‍लेशकारकच असते. त्यात त्यांच्या मुलाचे वय पाहता त्याच्या भावना असंयमित होणे आपण समजू शकतो. मात्र, तरीही कुठलीही अशी गोष्ट होणे समर्थनीय नाही. नर्स, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मनोबल ढासळू देऊ नये. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. आम्ही आहोत व प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून आहोत. प्रशासकीय यंत्रणा एकजुटीने हा संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com