या पोस्टरमुळे ठाण्यात खळबळ; पोलिसही चक्रावले...

....
controversial poster in thane city
controversial poster in thane city

ठाणे :  कुख्यात गुंड अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा (अभीष्टचिंतन) देणारे फलक ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरात लागल्याने रविवारी खळबळ उडाली.

छोटा राजन सध्या कारागृहात शिक्षा भोगत असतानाही ठाण्यातील गडकरी रंगायतन, कळवा नाका आणि धर्मवीरनगर (तुळशीधाम) येथील ठाणे महापालिकेच्या टीएमटी बस थांब्यावर ही अनधिकृत फलकबाजी करण्यात आली. याबाबत ठाणे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली. दरम्यान, राज्यात सरकार बदलल्यानंतर गुंडांचे उद्दात्तीकरण सुरू झाल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.

ठाणे शहराला वेगळा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. गेल्या काही वर्षांत ठाणे पोलिसांनी शहरातील गुंडगिरी संपुष्टात आणली असतानाच पुन्हा छोटेमोठे गुंड डोके वर काढू लागले आहेत. अशातच शनिवारी मध्यरात्रीनंतर ठाण्यात ठिकठिकाणी कुख्यात गुंड छोटा राजन याच्या अभीष्टचिंतनाचे फलक ठिकठिकाणी झळकल्याने खळबळ उडाली.

छोटा राजनचा वाढदिवस 13 जानेवारी रोजी आहे. या पार्श्‍वभूमीवर राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहासमोरील टीएमटी बस थांब्यावर, कळवा नाका आणि घोडबंदर रोडवरील धर्मवीरनगर या ठिकाणी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास छोटा राजन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले. या फलकांवर सी. आर. सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य असा उल्लेख असून आधारस्तंभ राजेंद्र सदाशिव निकाळजे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

या फलकावर शुभेच्छुक म्हणून संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष प्रकाश भालचंद्र शेलटकर यांच्या नावासह संघटनेच्या ठाणे शहर महिला अध्यक्ष संगीताताई शिंदे, मुंबई शहर अध्यक्ष राजाभाऊ गोळे आणि संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट हेमचंद्र ऊर्फ दादा मोरे आदींची छबी झळकत होती. या अनधिकृत फलकबाजीची माहिती पोलिसांना मिळताच तातडीने हे फलक हटवून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कोण आहे छोटा राजन?
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजन ऊर्फ नाना याच्या छोटा राजन या नावावरून सी. आर. (छोटा राजन) नावाची सामाजिक संघटना स्थापन करण्यात आली आहे.

हत्या, खंडणीसह धमकावणे आदी विविध गुन्ह्यांची नोंद असलेल्या छोटा राजन याला मुंबईतील एका वरिष्ठ पत्रकाराच्या हत्येप्रकरणी परदेशात अटक करण्यात आली. तेव्हापासून छोटा राजन तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीस छोटा राजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com