Contractor will be Charged for Accidents on Highway Says Deepak Kesarkar | Sarkarnama

महामार्गावर  अपघात झाल्यास ठेकेदारावर गुन्हा : दीपक केसरकर 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 जून 2019

यंदाच्या पावसाळ्यात महामार्गावर अपघात झाल्यास व त्यामध्ये कोणी दगावल्यास महामार्ग ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

सिंधुदुर्गनगरी : यंदाच्या पावसाळ्यात महामार्गावर अपघात झाल्यास व त्यामध्ये कोणी दगावल्यास महामार्ग ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन बैठक सभागृहामध्ये खनिज उत्खन्न व महामार्गाच्या सुरक्षेविषयी आयोजित बैठकीमध्ये त्यांनी या सूचना केल्या.यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी, महामार्गा ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी, सर्व विभागांचे अधिकारी, संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यासह महामार्गाच्या कामामुळे व खनिज उत्खननामुळे बाधीत झालेल्या गावातील ग्रामस्थ, पाणी टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

सावंतवाडी तालुक्‍यातील सोनुर्ली येथे झालेल्या गौण खनिजाच्या उत्खननाचे सर्वेक्षण करावे, अशा सूचना देऊन पालकमंत्री पुढे म्हणाले, "नियमबाह्य उत्खननावर कशा प्रकारे कारवाई करता येईल याविषयी जिल्हा खनिकर्म विभागाने प्रस्ताव सादर करावा. उत्खननासाठीच्या परवानग्या आणि मर्यादा याची सविस्तर माहिती द्यावी. खाणकाम करणाऱ्या कंपनीने ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय तत्काळ करावी, पर्यावरणाच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करून तो पर्यावरण विभागामाफत सादर करावा. महामार्गाचे काम सुरुळीत चालू रहावी ही ठेकेदाराची जबाबदारी आहे.'' 

ते पुढे म्हणाले, "ठेकेदाराने डायव्हर्शनचे बोर्ड योग्य प्रकारे लावून महामार्गावर अपघात होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. महामार्गावर होणाऱ्या अपघातास ठेकेदारास जबाबदार धरावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. गेल्यावर्षी पावसाळ्यात महामार्गासाठी टाकलेल्या भरावाची माती रस्त्यावर येऊन चिखल झाल्याने अनेक अपघात झाले व त्यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. यंदाच्या वर्षी असा एकही प्रकार होणार नाही. महामार्गावर माती येणार नाही याची ठेकेदाराने दक्षता घ्यावी.''

सोनुर्लीत पुन्हा सर्व्हेचे आदेश
यावेळी पालकमंत्री यांनी ब्लास्टिंगमुळे घरांना तडे गेलेल्या सोनुर्ली येथील बाधीत कुटुंबांचे म्हणणे जाणून घेतले व त्यानुसार संपूर्ण खाणकामाचा पुन्हा सर्वे करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख