A contract is given to kill me: Anil Gote | Sarkarnama

मला मारण्याची सुपारी देण्यात आली आहे : आ. अनिल गोटे

सरकारनामा
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

ज्याना बाय हूक ऑर क्रुक यश पाहिजे आहे असे तीन मंत्री आहेत. माझा पराभव करण्यासाठी या तिघांची सरकारने-पक्षाने नियुक्ती केली आहे. गिरीश महाजन, सुभाष भामरे आणि जयकुमार रावल यांनीच त्या सर्व गुन्हेगारांना पक्षात घेतले आहे.

- आ. अनिल गोटे

मुंबई : भाजपचे धुळ्यातील नाराज आमदार अनिल गोटे यांनी आज आपल्याला मारण्याची सुपारी देण्यात आल्याचे पत्रकारांना सांगून खळबळ निर्माण केली आहे. भाजपचे मंत्री सुभाष भामरे, गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांच्यावरही त्यांनी पुन्हा एकदा तोफ डागली आहे.

आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगताना आमदार गोटे म्हणाले, "माझ्याकडे एक सीडी आलेली आहे. या ध्वनिफितीत एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला असे सांगते आहे की, त्याच दिवशी आम्ही अनिल गोटेला उडवणार होतो. मी देशी कट्ट्यावरून नेम धरला होता. एका डॉक्‍टरने माझ्याकडून तो कट्टा हिसकावून घेतला. म्हणून तो म्हातारा-थेरडा वाचला.''

अनिल गोटे पुढे म्हणाले, "भाजपच्या नगरसेविका प्रतिमा चौधरी यांचा मुलगा अमोल चौधरी याने मला मारण्याची सुपारी दिली आहे. मला मारण्याबाबतचे ध्वनिमुद्रित संभाषण असलेली सीडी मी आज प्रसिद्ध केली. त्यानंतर ज्या व्यक्तीने मला हे संभाषण पाठवले होते. त्याला पुन्हा धमक्‍या देण्यात आल्या आहेत. आज दिलेल्या धमक्‍याची सीडीही माझ्याकडे आहे. म्हणजे पहा, किती निर्ढावलेले हे लोक आहेत.''

तुम्हाला मारण्याचा प्रयत्न नेमका कोण करीत आहे असे विचारले असता अनिल गोटे म्हणाले, "मी असे कोणाचे व्यक्तिगत नाव घेऊ शकत नाही. ज्याना बाय हूक ऑर क्रुक यश पाहिजे आहे असे तीन मंत्री आहेत. माझा पराभव करण्यासाठी या तिघांची सरकारने-पक्षाने नियुक्ती केली आहे. गिरीश महाजन, सुभाष भामरे आणि जयकुमार रावल यांनीच त्या सर्व गुन्हेगारांना पक्षात घेतले आहे.''

आपण दुसऱ्या पक्षात जाणार आहात काय? असे विचारले असता, अनिल गोटे म्हणाले, "मला दुसऱ्या पक्षात जायचे असते तर मी चार वर्षे तुरुंगवास भोगून आल्यानंतर बाहेर पडताच दुसऱ्या पक्षात गेलो असतो. पुन्हा भाजपमध्ये गेलो नसतो. माझ्या रक्ताच्या थेंबाथेंबात आरएसएस आहे. हे माझ्यावर आरोप करणाऱ्यांनाही माहीत आहे.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख