congress yatra in ambajogai | Sarkarnama

खर्गे, अशोक चव्हाणांनी अंबाजोगाईत घेतला भाजप नेत्याकडे पाहुणचार

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

पाहुणचारात राजकारणापेक्षा नातेसंबंध असले तरी पक्षप्रवेशाची हळुवार चाचपणी झाल्याचीही चर्चा आहे.

अंबाजोगाई (जि. बीड) : जनसंघर्ष यात्रेत काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षापासून पक्षाच्या संसदेतील पक्षाच्या नेत्यांनी भाजपवर शरसंधान साधले. मात्र, यात्रा संपल्यानंतर स्थानिक भाजप नेत्याच्या घरी पाहुणचार घेतल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली. काँग्रेस नेत्यांनी भाजप नेत्याकडे घेतलेल्या पाहुणचारात राजकारणापेक्षा नातेसंबंध असले तरी पक्षप्रवेशाची हळुवार चाचपणी झाल्याचीही चर्चा आहे.

काँग्रेस पक्षाची तिसऱ्या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रा गुरुवारी अंबाजोगाईत पोचली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या कायम निमंत्रीत सदस्या रजनी पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदींनी सभेत भाजपवर सडकून टिका केली. भाजप आश्वासनांचा कारखाना असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला. तर, सामान्यांचे पैसे घेऊन पळणाऱ्यांना भाजपने मदत केल्याचा आरोप मल्लीकार्जुन खर्गे यांनी केला. तर, पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष शहा हे रंगा - बिल्लाची जोडी असल्याचा घणाघात रजनी पाटील यांनी केला. मात्र, यात्रा संपल्यानंतर या नेत्यांचा ताफा पक्षाचे स्थानिक नेते दत्ता पाटील यांच्या घरी पाहुणचारासाठी पोचला. 

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व दत्तात्रय पाटील यांचे जवळचे नातेसंबंध असल्याने त्यांचे नेहमीच ऐकमेकांच्या घरी येणे - जाणे असते. यात्रेत हर्षवर्धन पाटीलही असल्याने याखेपेलाही घरी यावे असा दत्ता पाटलांचा आग्रह असल्याने सर्वच नेते घरी पोचले. पाहुणचारावेळी  मल्लिकार्जुन खर्गे यांनी दत्ता पाटील यांना ‘सोचो जरा’ असे म्हणून काँग्रेसचे निमंत्रण दिले.
 मात्र, आपला तसा काही विचार नसल्याचे स्पष्टीकरण नंतर दत्ता पाटलांनी दिले असले तरी सध्या त्यांना भाजपात बगल मिळत असल्याचा सूर त्यांच्या बोलण्यातून जाणवला. एकूणच पाहुणाचार नातेसंबंधाचा असला तरी त्याची राजकीय चर्चा झालीच. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख