कॉंग्रेसच्या हाती 'सोनभद्र'चे शस्त्र; संसदेत सरकारला धारेवर धरण्याची पक्षाची रणनीती 

कॉंग्रेसच्या हाती 'सोनभद्र'चे शस्त्र; संसदेत सरकारला धारेवर धरण्याची पक्षाची रणनीती 

नवी दिल्ली : सोनभद्रमधील हत्याकांडाच्या निषेधार्थ कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींच्या निदर्शनांतून उत्तर प्रदेशात संजीवनीची संधी शोधणाऱ्या कॉंग्रेसने हा मुद्दा संसदेमध्ये आक्रमकपणे मांडण्याची रणनीती आखली आहे. या मुद्द्यावर विरोधकांची एकजूट साधून मोदी सरकारला घेरण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न असेल. 

उत्तर प्रदेशातल्या सोनभद्र जिल्ह्यातील घोरावाल येथे जमिनीच्या वादातून दहा जणांचे हत्याकांड झाले. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने आज (ता. 22) सोनभद्र प्रकरणावर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये भाजपला घेरण्याची तयारी केली आहे. राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, तर लोकसभेत कॉंग्रेस नेते अधीररंजन चौधरी हा मुद्दा उपस्थित करतील, असे कॉंग्रेसमधून सांगण्यात आले.

या हत्याकांडात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियांका गांधी सोनभद्र येथे जात असताना पोलिसांनी त्यांना वाराणसीजवळ अडविल्याच्या निषेधार्थ प्रियांका गांधींनी धरणे आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विश्रांतिगृहात हलविले होते. या कारवाईचे राजकीय वर्तुळात त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. याच्या निषेधार्थ कॉंग्रेसने देशभरात ठिकठिकाणी आंदोलनही केले होते. 

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पथकही या हत्याकांडाची पाहणी करण्यासाठी गेले होते, तर बहुजन समाज पक्षानेही या घटनेचा तीव्र निषेध करताना भाजपला धावेर धरले होते. या दोन्हीही पक्षांची सक्रिय साथ संसदेत मिळेल, असा कॉंग्रेसचा होरा आहे. 

लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा नाट्यानंतर कॉंग्रेसमध्ये मरगळ असताना प्रियांका गांधी यांनी रस्त्यावर उतरून सुरू केलेला संघर्ष पक्षाला नवी ऊर्जा देणारा असल्याचे कॉंग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. 

त्यामुळे संसदेच्या व्यासपीठावरून देशभरातील आदिवासींना आणि पक्ष कार्यकर्त्यांना संदेश देण्याचा यातून प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान, अनुसूचित जमाती आयोगाने उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली असून, आयोगाचे एक पथक पाहणीसाठी उद्या सोनभद्रला जाणार आहे. तर, हे प्रकरण राजकीयदृष्ट्या चिघळल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोनभद्र येथे जाऊन मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. 

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे बंधू आणि लोकजनशक्ती पक्षाचे समस्तीपूरचे (बिहार) खासदार रामचंद्र पासवान यांचे आज दिल्लीत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. विद्यमान खासदाराचे निधन झाल्यास श्रद्धांजली वाहून संबंधित सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्याची प्रथा आहे. तसे झाल्यास लोकसभेत सोमवारऐवजी मंगळवारी हा मुद्दा उपस्थित केला जाईल, असेही कॉंग्रेसमधून कळते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com