पंजाबमध्ये काँग्रेसचे पुन्हा बल्ले बल्ले

भटिंडामध्ये केंद्रीय मंत्री हसिमरत कौर व फिरोजपूरमधून माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यामुळे अकाली दलासाठी दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या आहेत.
Captain-&-Harsimrat
Captain-&-Harsimrat

नवी दिल्ली :फाळणीच्या सर्वाधिक झळा झेललेल्या पंजाबातील 13 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेता, कॉंग्रेसचा येथे वरचष्मा राहणार व किमान 8 जागा या पक्षाला मिळणार हा एक्‍झिट पोलचा कौल सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जाणारा ठरू शकतो.

सामान्यतः निवडणुकीत "अँटी इन्कम्बन्सी' हा घटक प्रभावी असतो. पंजाबमध्ये मात्र अमरिंदरसिंग सरकारच्या नव्हे तर विरोधी पक्ष शिरोमणी अकाली दल-भाजपच्या विरोधातच वातावरण दिसते. संगरूर, गुरदासपूर, पटियाला, भठिंडा व फिरोजपूर या पाच जागांवरच कॉंग्रेसला धोका दिसतो.

जे मंत्री चांगली कामगिरी करणार नाहीत त्यांची खुर्ची जाईल असा इशारा देणाऱ्या अमरिंदरसिंग यांना नवज्योतसिंग सिध्दू यांच्या पत्नी व मंत्री नवज्योत कौर सिध्दू यांनीच अखेरच्या टप्प्यात घरचा आहेर दिला. 

पाकिस्तानला लागून असलेल्या पठाणकोटपासून पतियाळापर्यंत आणि वाघा-अटारी सीमेपासून बटालापर्यंतच्या पट्ट्यात बेरोजगारीची समस्या उग्र आहे. सधन पंजाबच्या युवा पिढीला अंमली पदार्थांचा घट्ट विळखा बसला आहे. हे अंमली पदार्थ सीमेपलीकडून येतात हा राजकीय प्रचाराचा भाग झाला. पण ते भारताची सीमा ओलांडून आल्यावर त्यांच्या वितरणाची व्यवस्था करणारी येथील नेतेमंडळीच नाहीत का,? हा ग्रामीण जनतेचा सवाल काळीज हेलावणारा ठरतो आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखेरच्या टप्प्यात तीन-चार जाहीर सभा घेतल्या. मोदींनी गुरूदासपूरमध्येच राजीव गांधींना भ्रष्टाचारी नंबर वन म्हटले त्याचे देशभरात पडसाद उमटले. 
पंजाबची खरी राजधानी असलेल्या अमृतसरमध्ये तर 99 टक्के लोकांनी यंदा कॉंग्रेसच, असे सांगितले. हरदीपसिंग पुरी नामक केंद्रीय मंत्री येथे रिंगणात आहेत हे त्यांच्या गावीही नव्हते ! गौतम गंभीर यांचा रोड शो अक्षरशः फ्लॅप झाला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी (16मे) भाजपला येथ सनी देओल यांचा रोड शो ठेवावा लागला.

 कॉंग्रेसचे खासदार गुरजीतसिंग औजला यांची जास्त चर्चा अमृतसरमध्ये आहे. अकाली-भाजप - कॉंग्रेस या दोन कोनातील तिसरा कोन असलेल्या आम आदमी पक्षाचा प्रभाव यंदा पार ओसरल्याचे दिसत आहे. संगरूरमधून स्वबळावर आघाडी घेतलेले भगवंत मान वरचढ आहेत. राज्यातील सर्वांत श्रीमंत उमेदवार, कॉंग्रेसचे केवलसिंग ढिल्लों यांच्याशी त्यांची लढत आहे. पतियाळात आपणधून निलंबित केलेले डॉ. धर्मवीर गांधी अमरिंदरसिंग यांच्या पत्नी परणीत कौर यांना जोरदार टक्कर देत आहेत. 

गुरूदासपूरमध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील जाखड यांच्यासमोर भाजपने सनी देओल यांचा पत्ता फेकला आहे. उमेदवारांमधील व्यक्तिगत चिखलफेक दिसत नाही . मात्र येथील सातच्या सात विधानसभा मतदारसंघांत कॉंग्रेसचे आमदार असले तरी जाखड यांच्यासमोरचे आव्हान मोठे आहे. 
भटिंडामध्ये केंद्रीय मंत्री हसिमरत कौर व फिरोजपूरमधून माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यामुळे अकाली दलासाठी दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या आहेत. 

 

हाताला काम  नाही
सीमावर्ती अटारी-वाघा पट्ट्यात बेरोजगारीच्या वेगळ्या पैलूचे दर्शन घडले. या भागातील राणीगड, भडियार, लोकोपे, आदी गावांमध्ये फेरफटका मारला असता गावातील तरूण पत्त्यांचा डाव मांडून बसले. कारण विचारता ते रागाने म्हणाले की "साब ये बाते करनेसे हमे दिल्ली ले चलो !'

हाताला काम का नाही, तर मोदी सरकारने पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा "मोस्ट फेवर्ड नेशन' चा दर्जा काढून घेतला त्यानंतर या भागातून मुख्यतः रात्री ये जा करणाऱ्या शेकडो ट्रकच्या किंवा अटारी स्थानकावरील मालवाहतुकीवर प्रचंड विपरीत परिणाम झाला. किंबहुना ती वाहतूक जवळपास थांबलीच. या ट्‌करवर माल चढविण -उतरविण्याचे काम करणारे शेकडो तरूणांवर यामुळे एका फटक्‍यात बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली अशी व्यथा या गावकऱ्यांनी मांडली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com