मनसेला आघाडीत घेण्यास हरकत नाही : अशोक चव्हाण 

मनसेला आघाडीत घेण्यास हरकत नाही : अशोक चव्हाण 

नागपूर : पक्षश्रेष्ठी आणि आघाडीतील मित्र पक्षांचा आक्षेप नसल्यास मनसेला सोबत घेण्यास आपला विरोध नसल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 

लोकसभेच्या वेळी मनसेला आघाडीत घेण्यास चव्हाण यांनी विरोध केला होता आता मात्र त्यांचा विचार बदललेला दिसतो. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसे कॉंग्रेसबरोबर जाणार का ? याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच चव्हाण यांनी मनसेविषयी सकारात्मक भूमिका मांडली आहे. 

एका खासगी कार्यक्रमासाठी अशोक चव्हाण काल नागपूरला आले होते. यावेळी त्यांना मनसेबाबत विचारणा केली असताना मनसेचा पर्याय खुला असून अद्याप याचा निर्णय झाला नसल्याचे सांगितले. लोकसभेच्या वेळी आम्ही मनसेचा विचार केला नव्हता. आता विचार बदलला आहे, असेही ते म्हणाले. लोकसभेतील पराभवानंतर लगेच आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नव्या प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत धुरा सांभाळण्यास आपणास सांगण्यात आले आहे. 

ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीसाठी आमची दारे आजही खुली आहेत. चर्चेसही तयार आहोत. वंचितचे पदाधिकारी परस्पर विरोधात विधाने करीत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. याबाबत त्यांनीच वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्‍यक आहे. कर्नाटकातील राजकीय घडामोडींवर बोलताना भाजप देशाच्या लोकशाहीला काळिमा फासण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com