Congress Trying to Woo Narayan Rane | Sarkarnama

राणेंच्या स्वाभिमानाला राष्ट्रवादीची साद : 'पापक्षालना'साठी विखे अन्य मतदारसंघांची जबाबदारी घेणार

मृणालिनी नानिवडेकर
गुरुवार, 14 मार्च 2019

कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारनिश्‍चितीसंबंधीची अखेरची बैठक आज होत आहे. पुत्राच्या अपराधासाठी पापक्षालन करत राज्यात अन्यत्र प्रचार अन काही मतदारसंघांची संपूर्ण जबाबदारी अशी शिक्षा घेण्याची तयारी विखे बैठकीत दाखवणार असल्याचे समजते.

मुंबई : सुजय यांना मित्रपक्षाच्या हटवादी पवित्र्यामुळे पक्षाबाहेर जावे लागले अशी भूमिका घेत कॉंग्रेसमधील विखेसमर्थक नेत्यांनी आघाडी उभारली असतानाच महाराष्ट्रातील जागा वाढवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत डॉ. नीलेश राणे यांना पाठिंबा दया असा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसने समोर आणला आहे.राणे आपलेच असल्याचे विधान करीत कोकणतीाल त्यांचे एकेकाळचे सहकारी सुनील तटकरे यांनी परत या असे स्वाभिमानाला साद घालणारे विधान केले.

त्यातच मोदीविरोधी आघाडी बळकट करण्यासाठी आम्हाला एक़ जागा दया, अशी मागणी समाजवादी पार्टीने केली आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारनिश्‍चितीसंबंधीची अखेरची बैठक आज होत आहे. पुत्राच्या अपराधासाठी पापक्षालन करत राज्यात अन्यत्र प्रचार अन काही मतदारसंघांची संपूर्ण जबाबदारी अशी शिक्षा घेण्याची तयारी विखे बैठकीत दाखवणार असल्याचे समजते.

विखे घराण्याने कायम संधीसाधूपणाची वाट चोखाळली असा आक्षेप आज कॉंग्रेसमधील नेत्यांनी उघडपणे घेतला आहे.अहमदनगरातील ज्येष्ठ कॉंग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांनी जिल्हयाला सुजय यांचा नवा निर्णय मान्य होईल काय अशी विचारणा केली.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विखेंशी असलेले संबंध जगजाहीर असल्याने थोरातांना त्यांचा पाठींबा मिळेल. धृवीकरण होणार हे उघड होताच विखे यांचे समर्थकही सक्रीय झाले.

गेली दोन वर्षे मतदारसंघाची अविरत बांधणी करणाऱ्या तरूणाला राष्ट्रवादीच्या हटटामुळे बाहेर जावे लागले हे लक्षात घ्या असे दिल्लीला कळवण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या वेळी हायकमांडच्या इच्छेनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी पटवून घेतले ,तरीही त्यांना त्यांचे जवळचे मित्र विखे यांच्या मुलाची जागा राखता आली नाही,  अशी टीका एकीकडे सुरू होती तर प्रत्यक्ष विरोधी पक्षनेत्याच्या मुलानेच पक्ष सोडल्याने राहुल गांधी चव्हाण विखेंवर नाराज आहेत असे दुसरीकडे सांगितले जात होते. जागा वाढवण्यासाठी राजू शेटटी यांच्या पक्षाला,सपाला बरोबर घेवून जावे असा आग्रहही आज सुरू झाला.

त्यातच रत्नागिरीत योग्य उमेदवार सापडत नसल्याने तेथे नारायण राणे यांच्या मुलाला पाठिंबा दयावा असा सांगावा राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठवला आहे.कॉंग्रेसकडे उदयोगपती नविनचंद्र बांदिवडेकर आणि अॅड. राजेंद्र देसाई यांनी उमेदवारी मीागतली आहे.राणे यांनी कॉंग्रेसला दगा दिल्याने त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्‍न उपस्थित होतोच कुठे असे विचारत कॉंग्रेसने प्रथम नकार दिला.नंतर रावेरची जागा आम्ही लढवतो तुम्ही रत्नागिरीत काय ते करा असा निरोप धाडण्यात आल्याचे समजते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण राणे यांनी स्वाभिमानाला समर्थन असेल तर जरूर दया, पण माझा मोदींना पाठिंबा आहे असे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील भाजप शिवसेनेच्या जागा कमी करणे अत्यंत महत्वाचे असल्याने राणे यांचे मन वळवत त्यांना शिवसेनेविरोधात बाजू बदलण्याचे प्रयत्न अखेरपर्यत केले जाणार असल्याचे समजते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख