राज्यभर कोमात, तरी काँग्रेसची अंतर्गत संघटन बांधणी जोमात

'गेले ते कावळे, उरले ते मावळे', या उक्तीप्रमाणे काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून गेले, तरी काहींनी मात्र भविष्यकाळात उभारी घेण्यासाठी संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याचाच भाग म्हणून पक्षाने उत्तर महाराष्ट्र 'सेक्टर समन्वयक प्रशिक्षण कार्यशाळा' हा उपक्रम सुरू केला आहे.
Vinayakrao Deshmukh Congress
Vinayakrao Deshmukh Congress

नगर : 'गेले ते कावळे, उरले ते मावळे', या उक्तीप्रमाणे काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून गेले, तरी काहींनी मात्र भविष्यकाळात उभारी घेण्यासाठी संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याचाच भाग म्हणून पक्षाने उत्तर महाराष्ट्र 'सेक्टर समन्वयक प्रशिक्षण कार्यशाळा' हा उपक्रम सुरू केला आहे. नाशिक विभागातील जळगाव व नाशिक जिल्ह्यातील मतदार संघात अशा प्रकारचे प्रशिक्षण घेण्याची जबाबदारी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विनायकराव देशमुख यांच्याकडे सोपावली आहे. त्यांनी भाषणे, आरोप-प्रत्यारोप याला फाटा देत तांत्रिकदृष्ट्या अभ्यासक्रम बनवून कार्यशाळेला वेगळे स्वरुप दिले आहे.

प्रत्येक पक्षाचे ठराविक दिवस असतात. राजकारणात पराभव व विजय या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असतात, हेच स्विकारून काँग्रेसने पराभवाला हार न मानता अंतर्गत संघटन बांधणी मात्र जोरात सुरू केली आहे. पक्षाची वाताहात होण्याला प्रामुख्याने वैचारिक पाया भक्कम नसल्याचे पक्षाच्या लक्षात आल्याने अतिशय शांतपणे व देशभरातील राजकीय वादळाला न जुमानता काँग्रेस पुन्हा भरारी घेण्यासाठी प्रय़त्न करीत आहे.

सेक्टर समन्वयक प्रशिक्षण कार्यशाळेत काँग्रेसची विचारधारा, राज्यातील प्रमुख राजकीय मुद्दे, सेक्टर समन्वय पुस्तिकेचे वितरण, बुथ पातळीवरील प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन, विधानसभा पातळीवरील जाहीरनाम्याबाबत चर्चा, प्रशस्तीपत्रक वितरण अशा स्वरुपात सर्वसामान्य नागरिकांना थेट भिडण्याचे प्रय़त्न सुरू आहेत. विधानसभा निवडणूक तयारी प्रकल्प हाती घेऊन त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक बुथवर कार्यकर्ता बांधणी करण्याचा हा प्रयत्न सरू आहे. 'निर्धार कार्यकर्त्यांचा, संकल्प विजयाचा' हे ब्रिद घेऊन कार्यकर्त्यांचे मनोधर्य खचू न देण्यासाठी व आगामी काळात भाजपच्या लाटेत टिकून राहण्यासाठी हा प्रकल्प पथदर्शी समजला जातो.

तांत्रिक अभ्यासक्रम तयार
विनायकराव देशमुख स्वतः अभियंते आहेत. त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यासाठी त्यांनी युट्यूब, सोशल मीडिया, प्रेझेंटेशन, डेटा विश्लेषण, राजकीय घडामोडी आदींचा वापर केला आहे. बुथ पातळीवर काय अडचणी असतात, ईव्हीएम मशिन कसे काम करते, सध्याच्या आर्थिक मंदीचे दुष्परिणाम कसे होत आहेत, बेरोजगारीने तरुण कसे ग्रासले आहेत, याबाबत त्यांनी राज्य व देश पातळीच्या स्लाईड शो, यु-ट्यूब क्लिप्स, व्हिडिओ, तज्ज्ञांची भाषणे, संबंधित घटनांचा मागोवा घेणारे प्रेझेंटेशन तयार केले आहेत. सोप्या भाषेत व सर्वसामान्यांना समजेल अशा स्वरुपात प्रोजेक्टरच्या दे दाखविण्यात येते. नेहमीचे कार्यकर्त्यांचे मेळावे, नेत्यांची भाषणे, विरोधकांवर जोरदार आरोप या गोष्टींना फाटा देऊन एकनिष्ठ कार्यकर्ता बनविण्यासाठी वैचारिक वज्रमुठ तयार करण्याचा प्रयत्न होत आहे.

काँग्रेस उभारी घेईल : देशमुख
''काँग्रेसची विचारधारा मोठी आहे. हा पक्ष सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे. त्यामुळे मुळ विचार रुजविण्यासाठी पक्ष शांतपणे काम करीत आहे. तो आगामी काळात चांगली उभारी घेणार आहे. त्याचाच भाग म्हणून कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी चल्ला वामशी चंद्र रेड्डी यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यशाळेची आखणी केली आहे. त्यानुसार जळगाव येथे दोन दिवस (ता. ८ व ९) अशी कार्यशाळा होणार आहे. जामनेर, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर येथे अशा कार्यशाळा होतील. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नांदगाव, दिंडोरी, बागलाण येथे कार्यशाळा होणार आहेत. ५ बुथमागे १ असा ३०० बुथमागे ६० समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यानंतर हे समन्वयक त्यांच्या बुथच्या परिसरातील कार्यकर्त्यांना अशाच पद्धतीने पुढील १५ दिवस मार्गदर्शन करणार आहेत,'' असे विनायकराव देशमुख यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com