Congress in Trouble in Goa | Sarkarnama

सत्तेच्‍या वादळात काँग्रेस भुईसपाट!  विरोधी पक्षनेत्‍यासह दहा आमदार भाजप विधिमंडळ गटात सहभागी 

अवित बगळे
गुरुवार, 11 जुलै 2019

गोवा विधानसभेच्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरवात होणार असतानाच काल काँग्रेसला खिंडार पडले. काँग्रेसचे १५ पैकी १० आमदार भाजपमध्ये सहभागी झाले. आता राज्य मंत्रिमंडळात मोठे फेर बदल   होणार आहेत. चार नवे मंत्री मंत्रिमंडळात घेतले जाणार आहेत. त्यासाठी गोवा फॉरवर्डचे तीन व एका अपक्षाला मंत्रिमंडळातून वगळले जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आता दिल्लीत असून ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यांनंतर याबाबत निर्णय घेणार आहेत.

पणजी : गोवा विधानसभेच्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरवात होणार असतानाच काल काँग्रेसला खिंडार पडले. काँग्रेसचे १५ पैकी १० आमदार भाजपमध्ये सहभागी झाले. आता राज्य मंत्रिमंडळात मोठे फेर बदल   होणार आहेत. चार नवे मंत्री मंत्रिमंडळात घेतले जाणार आहेत. त्यासाठी गोवा फॉरवर्डचे तीन व एका अपक्षाला मंत्रिमंडळातून वगळले जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आता दिल्लीत असून ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यांनंतर याबाबत निर्णय घेणार आहेत.

भाजपमध्ये सहभागी झालेले आमदार  मध्यरात्री एक वाजता तातडीने दिल्लीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले होते. ते आज सकाळी शहा यांना भेटणार  आहेत.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी विधानसभा पोटनिवडणूक निकालाच्यावेळी काँग्रेसचे १० आमदार संपर्कात आहेत, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर तातडीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्याचे खंडन केले होते. मात्र, काल काँग्रेसच्या १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्याने तेंडुलकर हे केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी काँग्रेसचे आमदार संपर्कात आहेत, असे सांगत नव्हते हेही सिद्ध झाले आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला १३ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर लगेच वाळपईचे तत्कालीन आमदार विश्‍‍वजित राणे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश घेतला. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर या काँग्रेसच्या आमदारांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार मनोहर आजगावकर आणि दीपक पाऊसकर यांनी यावर्षी मार्चमध्ये पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदीचा आधार घेत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता या १० आमदारांनी त्याच तरतुदींचा वापर करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही फूट पडली असून त्यांच्यासोबत आतानासिओ मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, फ्रान्‍सिस सिल्वेरा, इजिदोर फर्नांडिस, आतोनिओ फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, नीळकंठ हळर्णकर, क्लाफासिओ डायस आणि विल्फ्रेड डिसा हे आमदार आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या विधिमंडळ गटाचे नेते या नात्याने हे आमदार विधिमंडळ गटात सहभागी झाल्याचे पत्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभापती राजेश पाटणेकर यांना सादर केले. 

या घडामोडींमुळे काँग्रेसकडे प्रतापसिंह राणे, रवी नाईक, लुईझिन फालेरो, दिगंबर कामत आणि आलेक्स रेजिनाल्ड हेच आमदार राहिले आहेत. त्यापैकी रेजिनाल्ड वगळल्यास इतर सर्व माजी मुख्यमंत्री आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख