Congress to take review on Aurangabad seat | Sarkarnama

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे करायचे काय ?  कॉंग्रेसकडून गुरुवारी आढावा 

जगदीश पानसरे 
बुधवार, 19 डिसेंबर 2018

.

औरंगाबादः   राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगाबाद काँग्रेसकडे मागितल्याने याबाबत काय करायचे यावर गुरुवारी आढावा घेतला जाईल असे समजते . 

कॉंग्रेसकडून मराठवाड्यातील आठही लोकसभा आणि विधानसभेच्या 48 मतदारसंघाचा आढावा घेण्याची तयारी सुरू आहे. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी संपद कुमार 20 ते 23 डिसेंबर दरम्यान मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगाबाद मध्ये काँग्रेसचा सातत्याने पराभव होत असल्याने ही जागा आम्हाला सोडावी असा आग्रह चालवला आहे . माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांनीही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यास सहमती दर्शवली आहे . पण आमदार अब्दुल सत्तर , सुभाष झांबड आणि अन्य नेते ही जागा काँग्रेसनेच लढवावी यासाठी आग्रही आहेत . 

आगामी लोकसभा व त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आघाडीचे संकेत दिले जात आहेत. लोकसभेच्या 48 पैकी 40-42 जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे देखील शरद पवार, अशोक चव्हाण या नेत्यांनी स्पष्ट केले. 
 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुका आणि त्यात भाजपची सत्ता असलेली तीन राज्य जिंकल्यानंतर कॉंग्रेसचा आत्मविश्‍वास अधिकच बळावला आहे.

राज्यात आणि देशात कॉंग्रेसची ताकद वाढली असली तरी कॉंग्रेस समविचारी पक्षांशी आघाडी करूनच येणाऱ्या निवडणूका लढणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी औरंगाबाद दौऱ्यात स्पष्ट केले होते. 

तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील येणाऱ्या लोकसभेत आघाडी करूनच निवडणुका लढणार असल्याचे स्पष्ट केले होते.

अगदी लोकसभेच्या 48 पैकी 40 जांगावर दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे देखील या नेत्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. असे असतांना कॉंग्रेसने पुन्हा एकदा मराठावाड्यातील लोकसभा व विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार महाराष्ट्राचे सहप्रभारी आमदार संपद कुमार हे उद्या (ता.20) पासून मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. गुरूवारी सकाळी अकरा वाजता गांधीभवन येथे ते औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा तर दुपारी दुसऱ्या टप्यात जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. 

दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 रोजी बीड, उस्मानाबाद, 22 ला लातूर, परभणी तर 23 तारखेला हिंगोली आणि नांदेड या मतदारसंघामध्ये आजी, माजी खासदार, आमदार, जिल्हा कॉंग्रेसचे पदाधिकारी, बुथ कमिटी सदस्य व अन्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संबंधित जिल्ह्याचा आढावा घेण्यात येणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख