काॅंग्रेसचे खेडमध्ये शक्तिप्रदर्शन; राष्ट्रवादीचे शैलेश मोहिते व राक्षेही उपस्थित

काॅंग्रेसचे खेडमध्ये शक्तिप्रदर्शन; राष्ट्रवादीचे शैलेश मोहिते व राक्षेही उपस्थित

शिरोली : खेड तालुका हा परिवर्तनशील आहे. येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना तंतोतंतपणे प्रदेशाध्यक्षांना कळविण्यात येतील. कोणत्याही परिस्थितीत खेड-आळंदी विधानसभा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावा, यासाठी मी १०० टक्के प्रयत्न करेन. सर्वांनी आघाडी धर्माचे पालन करावे, असे आवाहन पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी केले.

खेड तालुका काँग्रेस पक्षाने आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. चांडोली (ता. खेड) येथील संकल्प मंगल कार्यालयात रविवारी (दि. २२) आयोजित केलेल्या या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष विजय डोळस, युवक प्रदेश सरचिटणीस प्रिया पवार, राजगुरूनगर बँकेचे संचालक किरण आहेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. शैलेश मोहिते पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल (बाबा) राक्षे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष विशाल तुळवे, संग्राम मोहोळ, जमीर काझी, सोमनाथ दौंडकर, अर्चना शहा, जया मोरे, अमोल दौंडकर, सदाशिव कोहिणकर, निलेश कड, सुभाष गाढवे, दिपक थिगळे यांच्यासह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात राष्ट्रवादीचे शैलेश मोहिते व अनिल राक्षे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. माजी आमदार दिलीप मोहिते यांचे पुतणे डॉ. शैलेश मोहिते यांनी स्वतःवरील टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. 'घर का भेदी लंका डोही' अशी टीका माझ्यावर होते. मात्र मी रावण नसून बिभीषण आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. डॉ. अमोल कोल्हे हे शिवस्वराज्य यात्रेत व्यस्त आहेत मात्र विरोधक त्यांच्या अनुपस्थितीबाबत चुनावी जुमला करून दिशाभूल करीत आहेत, असा खुलासा मोहिते यांनी केला. पंचायत समिती सदस्य अमोल पवार यांनी हा मेळावा आयोजित करून मोठे शक्ती प्रदर्शन केल्याने खेडच्या राजकारणातील चुरस वाढली आहे.

प्रास्ताविकात विजय डोळस म्हणाले की गेल्या पाच वर्षांत या सरकारमुळे राज्य पाच वर्षे विकासात मागे गेले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यामुळे खेड तालुक्यात औद्योगिक क्रांती झाली. विद्यमान आमदारांनी तालुक्यातील तरुणांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला. आमचा मित्र पक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही लोकसभेला मदत करतो. पण मित्र पक्ष आम्हांला कोणत्याही  निवडणुकांत मदत करत नाही. हुतात्मा राजगुरू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके झाली नाहीत. खेड आळंदी विधानसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला मिळावी.

प्रिया पवार बोलताना म्हणाल्या की पक्षनिष्ठा काय असते हे माझे वडील स्वर्गीय माजी आमदार नारायणराव पवार यांच्याकुडून शिकावी. त्यांनी खेड तालुका सुजलाम सुफलाम केला. अमोल पवार यांना पक्षाने उमेदवारी द्यावी.

अनिल राक्षे यांनी स्वपक्षीय व विरोधी पक्षातील मातब्बरांचा खरपूस समाचार घेतला. राजकारण हे नेहमी खेळीमेळीचे असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आम्ही मागील निवडणुकीत तालुक्यात परिवर्तन घडवून आणले. विद्यमान  आमदार म्हणाले की मला पाच वर्षे द्या. आता मात्र त्यांना खुर्चीची उब सुटत नाही. दरवेळेस मोहिते व गोरे दोघेच इच्छुक असतात. तालुक्यात निवडणूक बाकीच्यांनी लढवायची की नाही ? अमोल पवार यांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही त्यांचे नक्कीच काम करू. मला उमेदवारी मिळाल्यास त्यांनी देखील आघाडी धर्माचे पालन करावे.

अमोल पवार यांनी आपल्या घणाघाती भाषणात तालुक्याचा ढासळता लेखाजोखा मार्मिकपणे मांडला. खेड तालुक्यातील जनता सुज्ञ व सक्षम असून व्यक्तिसापेक्ष मतदान होत असल्याने पक्षाने मला संधी द्यावी. दरवेळेसप्रमाणे काँग्रेसची मदत न मिळाल्यानेच खासदार आढळराव यांचा पराभव झाला. त्यावरून काँग्रेस पक्षाच्या ताकतीचा अंदाज सर्वांना कळून चुकला आहे. मागील वेळेस  मी, शरद बुट्टे, अनिल राक्षे, राजू जवळेकर, अतुल देशमुख आदींनी परिवर्तन आघाडी काढून सत्ता परिवर्तनात महत्त्वाची भूमिका पार पाडली. मात्र सुरेश गोरे यांनी जाण ठेवली नाही. राष्ट्रवादीत अनेक गट-तट आहेत. त्यामुळे एकसंध काँग्रेसला खेडवासीयांचा पाठींबा मिळेल. खेड आळंदी विधानसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला मिळावी, अशी आग्रही मागणी पवार यांनी केली.

यावेळी अर्चना शहा, जया मोरे व विशाल तुळवे यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन ऍड. शुभम घाडगे यांनी करून आभार व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com