Congress searching place for new office | Sarkarnama

कार्यालयासाठी जागा शोधतेय काँग्रेस

संदीप खांडगेपाटील
गुरुवार, 27 एप्रिल 2017

मेट्रोकडून मंत्रालयासमोरील परिसरात असलेल्या महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस मुख्यालयासह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस,समाजवादी पक्ष यांना पक्ष कार्यालये मोकळे करून देण्याच्या वारंवार लेखी सूचना देवून मेट्रोकडून पाठपुरावाही करण्यात येत होता. तथापि आधी पर्यायी जागा देवून आमचे पुनर्वसन करा आणि मगच आमची कार्यालये खाली करा असा हेका राजकीय व राष्ट्रीय पक्षांकडून चालविण्यात येत असल्याने मेट्रोच्या प्रकल्पाला विलंब  होत होता.

 

 

कॉंग्रेस पक्ष व मेट्रो कार्यालय यांच्यात कार्यालय स्थंलातरणावषयी बोलणी चालू असताना मेट्रो रात्रीच्या ११ वाजता अशी   कृती  करेल  याची आम्हाला अपेक्षा नव्हती. कॉंग्रेस पक्ष कधीही विकासाच्या आड  नसल्याने कॉंग्रेसकडून त्यांना  सहकार्यच केले जाईल अशी प्रतिक्रिया  महाराष्ट्र  कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत  यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई : घर फिरले की घराचे वासेही फिरतात या उक्तीचा अनुभव सध्या कॉंग्रेस पक्षाला केंद्रापासून राज्याच्या कानाकोपर्‍यात येत आहे. काल रात्री ११ वाजता मेट्रोसारख्या शासकीय प्राधिकरणाने कॉंग्रेस पक्षाच्या मंत्रालयासमोरील प्रदेश मुख्यालयाचा वीज  पुरवठा खंडीत केल्याने प्रदेश कॉंग्रेसला नवीन कार्यालयासाठी मेट्रोेचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे.

मंत्रालयासमोरील परिसरातून मेट्रो जात असल्याने गेल्या काही महिन्यापासून मेट्रोकडून मंत्रालयासमोरील परिसरात असलेल्या महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस मुख्यालयासह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस,समाजवादी पक्ष यांना पक्ष कार्यालये मोकळे करून देण्याच्या वारंवार लेखी सूचना देवून मेट्रोकडून पाठपुरावाही करण्यात येत होता. तथापि आधी पर्यायी जागा देवून आमचे पुनर्वसन करा आणि मगच आमची कार्यालये खाली करा असा हेका राजकीय व राष्ट्रीय पक्षांकडून चालविण्यात येत असल्याने मेट्रोच्या प्रकल्पाला विलंब  होत होता.

त्यामुळे मेट्रोने आक्रमक भूमिका घेत रविवारी, दि. २३ एप्रिल रोजी रात्रीच्या ११ वाजता या कॉंग्रेस  प्रदेश  कार्यालयासह अन्य राजकीय पक्षांचा वीज पुरवठा खंडीत करत त्यांना पक्ष कार्यालय सोडण्यास भाग  पाडले आहे.मेट्रोकडून कॉंग्रेस  पक्षाला मॅजेस्टीक आमदार निवाससमोरील रिगल टॉकीजजवळील तन्ना  हाऊसमध्ये पाच वर्षाकरिता पर्यायी जागा देण्यात येणार असून मेट्रोचे  काम संपल्यावर त्यांना पुन्हा त्यांचे  कार्यालय ताब्यात दिले जाणार आहे.

 यासाठी मेट्रो  व कॉंग्रेसमध्ये बोलणी  अंतिम टप्प्यात आली  असून दोन ते तीन दिवसामध्ये कॉंग्रेसला प्रदेश कार्याकरिता कार्यालय निश्‍चित करण्यात येणार आहे. कॉंग्रेस कार्यालय फर्निचरसह सुसज्ज अवस्थेत मेट्रोकडून  दिले जाणार असून त्याकरिता दोन ते तीन महिन्याचा कालावधी जाणार आहे. यादरम्यान प्रदेश कॉंग्रेसचा कारभार मुंबई महापालिका मुख्यालयाजवळील मुंबई प्रदेश कॉंग्रेसच्या  कार्यालयातून  तसेच दादर येथील टिळक भवनातून चालविण्यात येणार आहे.

गेली ४० वर्षे मंत्रालयासमोरील कॉंग्रेस कार्यालयातून  महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचा कारभार चालविला जात होता. या कार्यालयात मुख्यमंत्र्यांपासून ते पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी नियमित हजेरी लावतात. या कार्यालयात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नऊवारी साडी परिधान केलेल्या तैलचित्राचे अनावरण करण्यासाठी राजीव गांधी पंतप्रधान असताना या प्रदेश कार्यालयात आले होते.

 याशिवाय प्रणव मुखर्जी, मनमोहनसिंग, कपिल सिब्बल यांच्यासह दिल्लीतील अनेक नेत्यांची या ठिकाणी अनेक काळ उठबस झालेली आहे. पाच वर्षे आता या कार्यालयातून कारभार चालणार नसल्याने राज्यभरातून येणार्‍या कॉंग्रेस कार्यकर्त्यांना व पदाधिकार्‍यांना आपले काम करून घेण्यासाठी आपल्या नेतेमंडळींची मुंबई प्रदेश कॉंग्रेस कार्यालयात  अथवा दादर येथील टिळक भवनात शोधाशोध  करावी लागणार आहे. मेट्रोकडून रात्रीच्या ११ वाजता वीजपुरवठा खंडीत करून कार्यालय सोडण्यास भाग पाडण्याच्या कृतीविषयी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख