काश्‍मीरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीची बैठक थांबविली

काश्‍मीरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीची बैठक थांबविली

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी कुणाची निवड होते आहे ही उत्सुकता अखेर रात्री उशीरा म्हणजे 10 नंतर संपुष्टात आली. दहाच्या सुमारास कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकारपरिषद घेऊन जम्मू काश्‍मीरमधील घडामोडींची चर्चा करण्यासाठी मला खास बोलावण्यात आल्याचे स्पष्ट केले. केंद्रसरकारने काश्‍मीरमधील परिस्थितीची नेमकी कल्पना द्यावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. याबाबत सरकारने पारदर्शकपणाने माहिती द्यावी असाही आग्रह त्यांनी धरला. अध्यक्षपदाबाबत काय होणार याबद्दलचे उत्तर त्यांनी थेट देण्याचे टाळले. मला खास या विषयावर चर्चा करण्यासासाठी मला बोलावले होते असे त्यांनी सांगितले. काश्‍मीरमधल्या घडामोडीबाबत चिंता असल्याने आम्ही त्यावर चर्चा करत आहोत असे त्यांनी सांगितले. मात्र कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीची बैठक थांबविली गेल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून यावेळी स्पष्ट झाले. 

कॉंग्रेस मुख्यालयात सकाळी अकराच्या सुमारास सोनिया गांधी, मावळते कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी, डॉ. मनमोहनसिंग यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीच्या बैठकीस सुरवात झाली. मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची राहुल गांधी, प्रियांका गांधी जिंदाबादची घोषणाबाजी सुरू असताना बैठकीत राहुल यांनी राजीनामा मागे घेण्याचा पक्ष नेत्यांचा आग्रह नाकारला. 

अधीर रंजन चौधरी, के. एच. मुनियप्पा यांनी हात जोडून राहुल गांधींना अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली. तर सल्लामसलतीअंती तुमचेच नाव अध्यक्षपदासाठी आ ले तर काय कराल, या पी. चिदंबरम यांच्या सवालावर राहुल गांधींनी बोलण्याचे टाळले. राहुल यांनी " क्रीजच्या बाहेर येऊन षटकार ठोकला आहे. तो परत क्रीजमध्ये जाणार नाही. मात्र तरीही त्यांना आग्रह आहे की राजीनामा मागे घ्यावा,' असे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले. मात्र राहुल गांधींनी सर्वांचे आभार मानताना, अध्यक्ष पद नसले तर सक्रीय राहणार नाही असे समजू नये. उलट आपण अधिक सक्रीय राहू, असे स्पष्ट केल्यानंतर अखेर नव्या नावावर पक्ष नेत्यांचे अभिप्राय जाणून घेण्याचे ठरले. 

सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी मात्र या प्रक्रियेत सहभागी होण्याचे टाळले. अर्थात, सरचिटणीस असलेल्या प्रियांका गांधी मात्र सहभागी झाल्या होत्या. अन्य नेत्यांना खुलेपणाने नव्या नेतृत्वाबाबत मतप्रदर्शन करता यावे यासाठी हा निर्णय घेतल्याचे सोनियांनी सांगितले. उपस्थित सर्व सरचिटणीस, प्रभारी तसेच सचिव यांची प्रदेशनिहाय पाच गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. 

डॉ. मनमोहनसिंग, प्रियांका गांधी, अंबिका सोनी, तरुण गोगोई, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाकालील गटांनी सर्व नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. महाराष्ट्रातील नेत्यांनी खर्गे यांना आपले म्हणणे कळवले. हे अभिप्राय ऐकून घेतल्यानंतर पाचही गट प्रमुखांनी आपापले अहवाल तयार केले. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास पुन्हा कार्यकारीणीची बैठक झाली. 

दरम्यान, सल्लामसलत प्रक्रियेमध्ये बहुतांश नेत्यांचा आग्रह गांधी कुटुंबियांकडेच अध्यक्षपद राहावे, असाच होता. राहुल गांधी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहणार नसतील तर प्रियांका गांधींना अध्यक्ष बनवा. मात्र गांधी कुटुंब हेच कॉंग्रेसची एकजूट राखणारे दुवा आहेत, असा या अभिप्रायांचा सूर होता. झारखंडचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राहुल नाही तर प्रियांकाच अध्यक्षपदी आसाव्यात, अशी मागणी केली. असेच मत हिमाचल प्रदेशमधील कुलदीप शर्मा, पश्‍चिम बंगालचे प्रदीप भट्टाचार्य यांनी मांडले. तामिळनाडू, कर्नाटकमधील नेते मात्र राहुल यांच्याच नावावर आग्रही असल्याचे खासदार माणिक टागोर यांनी सांगितले. बी. के. हरीप्रसाद, राजीव गौडा यांनी मात्र नेतृत्वाच्या निकषांबद्दल मत मांडले. नवखा आणि फारसा माहित नसलेला चेहरा नको तर सर्वांना माहित असलेलेच नेतृत्व असावे. कार्यकर्त्यांशी संवाद असलेला आणि निवडणूक नव्हे तर पक्ष बळकटीचे उद्दीष्ट बाळगणारा अध्यक्ष असावा, असे बी. के. हरिप्रसाद म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com