Congress Postpones Jan Sanghsh Yatra | Sarkarnama

कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा पुढे ढकलली 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीतर्फे काढण्यात येत असलेल्या जनसंघर्ष यात्रेचा अंतिम टप्प्यातील यात्रा अचानकपणे पुढे ढकलण्यात आली आहे. ही यात्रा 15 डिसेंबरपासून नागपुरातून सुरू होणार होती. 

नागपूर : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीतर्फे काढण्यात येत असलेल्या जनसंघर्ष यात्रेचा अंतिम टप्प्यातील यात्रा अचानकपणे पुढे ढकलण्यात आली आहे. ही यात्रा 15 डिसेंबरपासून नागपुरातून सुरू होणार होती. 

राज्य सरकारच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी कॉंग्रेस पश्‍चिम महाराष्ट्रातून जनसंघर्ष यात्रा सुरू केली. या यात्रेचा अखेरचा टप्पा पूर्व विदर्भात होणार आहे. या यात्रेच्या तयारीच्या संदर्भात गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. यात 15 डिसेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत जनसंघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता. 

पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांमध्येही यात्रा जनजागृती करणार होती. परंतु अचानकपणे ही यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. 

छत्तीसगड व मध्यप्रदेशमध्ये कॉंग्रेसचा विजय झाल्यानंतर विदर्भातील काही आमदार व नेते या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहणार आहेत. आमदार सुनील केदार यांचे कमलनाथ यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. त्यांच्या छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातील काही तालुक्‍यातील प्रचाराची जबाबदारी सुनील केदार यांच्याकडे असते. हा भाग आमदार केदार यांच्या सावनेर मतदारसंघाला लागून आहे. हा भाग प्रामुख्याने मराठी भाषिक असल्याने केदार यांचे वर्चस्व आहे. 

गोंदियाचे आमदार गोपाल अग्रवाल यांचा मतदारसंघही छत्तीसगडला लागून असल्याने हे दोन्ही आमदार या काळात उपलब्ध राहणार नसल्याने यात्रेची जबाबदारी घेणारे हे दोन्ही नेते व्यस्त झाल्याने जनसंघर्ष यात्राच स्थगित करण्यात आली आहे. 

लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्याने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिाकर्जुन खरगे व्यस्त राहणार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या व्यस्ततेमुळे ही यात्रा पुढील महिन्यात लोकसभा अधिवेशन संपल्यानंतर सुरू करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ही यात्रा निघण्याची शक्‍यता असल्याची माहिती नागपूर शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख