काँग्रेसतर्फे नांदेड महापौरपदासाठी शीला भवरे यांचा अर्ज दाखल 

काँग्रेसतर्फे नांदेड महापौरपदासाठी शीला भवरे यांचा अर्ज दाखल 

नांदेड  : चारचौघींतून कोण होणार महापौर? याची उत्सुकता अखेर शुक्रवारी संपली असून महापौरपदासाठी कॉंग्रेसकडून शीला किशोर भवरे यांचा तर उपमहापौरपादसाठी विनय गिरडे पाटील यांचा अर्ज दाखल झाला आहे.

 त्यामुळे आता निवडीची फक्त औपचारिकता बाकी आहे. दुसरीकडे भाजपतर्फेही अर्ज दाखल झाल्यामुळे आता बिनविरोधची शक्यता मावळली आहे. येत्या बुधवारी (ता. एक) सकाळी ११ वाजता महापालिका सभागृहात निवड होणार आहे. 

महापालिकेत ८१ पैकी तब्बल ७३ जागा पटकावित कॉंग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविले असल्यामुळे त्यांच्याकडे सर्व पदे राहणार, ही उघड सत्य होते. भाजपला फक्त सहा जागांवर समाधान मानावे लागले तर शिवसेनेला फक्त एक आणि अपक्ष एका जागेवर निवडून आला आहे. 

महापौरपद यंदाच्या वेळेस अनुसूचित जाती (एससी) महिला प्रवर्गाला असल्यामुळे चौघीजण दावेदार होत्या. गुरुवारी (ता. २६) कॉंग्रेसकडून महापौरपदासाठी शीला किशोर भवरे, ज्योती सुभाष रायबोले, ज्योती मनीष कदम आणि दीक्षा कपिल धबाले या चार जणांनी तर उपमहापौरपदासाठी विनय गिरडे पाटील, सतीश देशमुख आणि प्रशांत तिडके या तिघांनी अर्ज घेतले होते. त्यामुळे आता यांच्यातूनच महापौर व उपमहापौर यांची निवड होणार हे निश्‍चित होते. 

शुक्रवारी (ता. २७) दुपारी दोन वाजता कॉंग्रेसच्या वतीने महापौरपदासाठी शीला किशोर भवरे तर उपमहापौरपदासाठी विनय गिरडे पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर झाल्यावर त्यांनी अर्ज दाखल केले. 

दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापौरपदासाठी बेबी जनार्दन गुपिले यांनी तर उपमहापौरपदासाठी गुरुप्रितकौर दिलीपसिंग सोडी यांनी प्रभारी नगरसचिव अजितपालसिंग संधू यांच्याकडे अर्ज दाखल केले.

या वेळी माजी विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, युवा मोर्चाचे अध्यक्ष दिलीपसिंग सोडी, संजय घोगरे पाटील, शीतल खांडील, बजरंग ठाकूर, राजू काकडे, प्रवीण साले, चैतन्य देशमुख, महादेवी मठपती आदी उपस्थित होते. 

महापौर आणि उपमहापौरपदाची निवड येत्या बुधवारी (ता. एक) सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात होणार आहे. या वेळी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे राहतील.

सुरवातीला दाखल केलेल्या अर्जाची छाननी होईल त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात येईल. त्यानंतर मतदान प्रक्रिया घेण्यात येईल. 

बिनविरोधची शक्यता मावळली 


कॉंग्रेसचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे महापौर व उपमहापौर त्यांचाच होणार हे निश्‍चित आहे. दरम्यान, कॉंग्रेसला प्रचंड मोठे बहुमत मिळाल्यामुळे महापौर आणि उपमहापौर यांची निवड बिनविरोध होईल, अशी शक्यता होती.

मात्र भाजपने फक्त सहा जागा मिळाल्या असल्या तरी निवडणूक लढविण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार भाजपकडूनही महापौर व उपमहापौरपदासाठी अर्ज शुक्रवारी दुपारी दाखल करण्यात आले. त्यामुळे आता बिनविरोध निवडीची शक्यता मावळली आहे; तसेच कॉंग्रेसचे महापौर आणि उपमहापौर होण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com