Congress-NCP politics | Sarkarnama

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते उद्यापासून रस्त्यावर 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 मार्च 2017

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांतर्फे उद्या (ता. 29) संघर्ष यात्रा चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव येथून काढणार आहे. या यात्रेला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची ज्येष्ठ नेतेमंडळी पहिल्य

नागपूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांतर्फे उद्या (ता. 29) संघर्ष यात्रा चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव येथून काढणार आहे. या यात्रेला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची ज्येष्ठ नेतेमंडळी पहिल्यांदा एकत्रितपणे रस्त्यावर उतरणार आहेत. 

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, ही मागणी विधिमंडळात विरोधी पक्षांनी लावून धरली होती. विधानसभेत या मागणीसाठी गोंधळ घातल्याप्रकरणी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 19 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. हा संघर्ष आता रस्त्यावर करण्यासाठी "चांदा ते बांदा' अशी संघर्षयात्रा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. 

या यात्रेची सुरवात उद्या, चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव (ता. सिंदेवाही) येथून होणार आहे. या यात्रेला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री जयंत पाटील यांच्यासह कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तसेच समाजवादी पार्टी, एमआयएम, शेकाप व रिपब्लिकन पक्षाचे सर्व आमदार उपस्थित राहणार असल्याचे विधानसभेतील कॉंग्रेस उपनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. 

पळसगाव येथील ज्ञानेश्‍वर करवाडे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन ही यात्रा सिंदेवाही येथे येईल. तेथे जाहीरसभा झाल्यानंतर संघर्षयात्रा मूल, चंद्रपूर, घुग्घुस, वणी, कारंजा, पांढरकवडा मार्गे यवतमाळ येथे जाईल. यवतमाळ येथे जाहीरसभा होईल व संघर्षयात्रेचा मुक्काम होईल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख