congress, mns distribute carrots in Kalyan | Sarkarnama

मोदींच्या निषेधार्थ कल्याणमध्ये गाजरवाटप! : मनसे, कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

कल्याण : निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नसून, अनेक प्रकल्प रखडले आहेत. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस, मनसे व अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. 18) पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कल्याण दौऱ्याची संधी साधून निषेध व्यक्‍त करण्यासाठी गाजराचे तोरण बांधले आणि गाजरवाटपही केले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत पैसे नसल्याने परिसरातील अनेक विकासकामे रखडली आहेत. लोकसभा, विधानसभा आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत, असा विरोधकांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर, ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो-5 मार्गाचे भूमिपूजन व अन्य प्रकल्पांची सुरुवात करण्यासाठी मोदी, फडणवीस व अन्य नेत्यांनी मंगळवारी कल्याणला भेट दिली. ही संधी साधून मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण पूर्वेला गणेश मंदिराजवळील स्कायवॉक, सिद्धार्थ नगर, आणि लोकग्राम रेल्वेपुलावर गाजराची तोरणे बांधून निषेध व्यक्त केला.

मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड, योगेश गव्हाणे, प्रशांत डोखे, जितेंद्र वाघचौरे आणि कार्यकर्त्यांनी गाजराचे वाटप केले. विरोधी पक्षांनी आंदोलने करू नयेत म्हणून पोलिस गस्त घालत होते, तसेच कार्यकर्त्यांची समजूत काढत होते. पोलिसांनी कॉंग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवला होता. स्वराज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रथमेश सावंत आणि अन्य कार्यकर्त्यांच्या घरासमोरही पोलिस तैनात होते. पोलिसांनी आपल्याला नजरकैदेतच ठेवले आहे, असा आरोप अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. गाजराचे तोरण बांधल्याबद्दल माजी नगरसेवक उदय रसाळ यांना कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. 

देशात लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही सुरू आहे. नागरिकांच्या समस्यांवर बोलू किंवा आंदोलन करू नये का? आंदोलन करणार नसल्याचे सांगूनही माझ्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे मला नातेवाइकाच्या लग्नासाठी पुण्याला जाता आले नाही, काॅंग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख