...आणि नाशिकच्या कॉंग्रेस निरीक्षकांचा मार्गच भरकटला

...आणि नाशिकच्या कॉंग्रेस निरीक्षकांचा मार्गच भरकटला

नाशिक : देश असो वा महाराष्ट्रात कॉंग्रेसची राजकीय वाटचाल अन्‌ मार्ग खडतर अन्‌ भरकटत चालल्याचे वारंवार जाणवते. त्यावर मार्ग काढण्याचे प्रयत्नही होत आहेत. याचाच प्रत्यय कॉंग्रेसचे निवडणूक निरिक्षक राजेंद्रकुमार झा यांनाही आला. नाशिकच्या निवडणुकीसाठी रांचीहून निघालेले झा स्थानिक नेत्यांच्या साठमारीत मुंबईहून पुणे, पुण्याहून औरंगाबाद अन्‌ औरंगाबादहून नाशिकला पोहोचले. त्यामुळे त्यांना पुण्याहून पुणतांब्याला पोहचण्याचे "राजकारण' कोणी केले याची चर्चा रंगली आहे. 

कॉंग्रेसच्या पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यात नाशिकसाठी झारखंडचे राजेंद्रकुमार झा यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती झाली. सामान्यतः राज्यातील जाणत्या किंवा शहराची माहिती असलेल्या नेत्यांनी निरीक्षक म्हणून नियुक्त केले जाते. मात्र या संकेतांचा पक्षाला विसर पडला असावा. त्याची झळ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बसली. 

श्री. झा रांचीहून मुंबईला पोहोचल्यावर त्यांच्यासाठी महारष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचा कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. त्यामुळे त्यांनी भाडोत्री वाहन केले व स्मार्टफोनचा "जीपीएस' सुरू केला. त्यात त्यांना मुंबईहून पुणे जवळ अत्यंत कमी वेळेत पोहोचण्याचे ठिकाण वाटले. त्यामुळे ते पुण्याला पोहोचले. पुण्याजवळ आल्यावर त्यांचे एक परिचीत औरंगाबाद इथे वास्तव्य करीत असल्याचे स्मरण झाले. त्यांनी त्यांच्यांशी संपर्क केल्यावर त्यांनी त्यांना औरंगाबादला येण्यास सांगितले. औरंगाबादला पोहोचल्यावर तेथून महाराष्ट्राचा "सुवर्ण चतुष्कोण'ला वळसा घालुन नाशिकला पोहोचले. 

श्री. झा यांचा नाशिक शहरात कोणाशीही परिचय नाही. त्यांना शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांचे पूर्ण नावही माहित नव्हते. शहराध्यक्षांना ते शरदजी तर जिल्हाध्यक्षांना राजारामजी असे संबोधत होते. त्यानुसार त्यांनी दुपारी तीनला नाशिकला पोहोचेन व चारला बैठक ठेवा अशी सूचना केली. गेले वर्षभर अत्यंत निष्क्रीय असा शिक्का बसलेले शहराध्यक्ष शरद आहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी आपली पदे जाणार या खात्रीने फारशी हालचाल किंवा त्यांच्याशी संपर्कही केला नाही. 

शहराध्यक्षांनी केवळ बैठकीचे नियोजन केले मात्र "जीपीएस' प्रवासामुळे दिवसभर प्रवास करुन दमलेले झा सायंकाळी सातला पोहोचले. तेव्हा प्रतिक्षा करुन बहुतांश कार्यकर्ते बैठक होणार नाही या अपेक्षेने निघून गेले. सायंकाळी सातला बैठक सुरु झाली तेव्हा सहा ब्लॉक समित्या व शहराची कार्यकारीणी अशी 190 पदे असलेल्या निवडणूकीसाठी केवळ 52 कार्यकर्तेच उपस्थित होते. एका गटाने शरद आहेर यांच्या निषेधार्थ बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे एकंदरच निरिक्षकाचा भरकटलेला प्रवास अन्‌ तुरळक उपस्थितीने कॉंग्रेसच्या नेत्यांत खुमासदार चर्चा मात्र रंगली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com