कॉंग्रेस नेते प्रकाश आंबेडकरांना म्हणतात 20 सप्टेंबरपर्यंत थांबा !

'वंचित'चा प्रस्ताव अद्याप कॉंग्रेसने मान्य केला नसून विरोधकांना सत्तेपासून रोखण्यासाठी 20 सप्टेंबरपर्यंत ऍड. प्रकाश आंबेडकरांनी वाट पाहावी, असे आवाहन कॉंग्रेस नेत्यांनी केले आहे.
Ad._Prakash_Ambedkar
Ad._Prakash_Ambedkar

सोलापूर  : लोकसभा निवडणुकीतील दमदार शक्तिप्रदर्शनानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी पुढे सरसावत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेलाही वंचितांचा फटका भाजप, शिवसेनेच्या तुलनेत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच बसण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

 'वंचित'चा प्रस्ताव अद्याप कॉंग्रेसने मान्य केला नसून विरोधकांना सत्तेपासून रोखण्यासाठी 20 सप्टेंबरपर्यंत ऍड. प्रकाश आंबेडकरांनी वाट पाहावी, असे आवाहन कॉंग्रेस नेत्यांनी केले आहे. परंतु, उद्या (शनिवारी) ऍड. आंबेडकर स्वबळाचा अंतिम निर्णय जाहीर करण्याची शक्‍यता आहे. 

राज्यात कॉंग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीचा बोलबाला अधिक असून कॉंग्रेसची चर्चाच बंद झाल्याचे चित्र आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने खासदार अमोल कोल्हे, विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रूपाली चाकणकर यांच्यासह अन्य नेत्यांनी विधानसभेच्या दृष्टीने प्रचाराला सुरवात करीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसह राष्ट्रवादीही सोबत असावी, असा सूर कॉंग्रेस नेत्यांमधून निघत आहे. मात्र, 'वंचित'ला राष्ट्रवादी नको असल्याने कॉंग्रेसची कोंडी झाली आहे. दरम्यान, 'एमआयएम'नेही आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने आता कॉंग्रेस संभ्रमात सापडली असून 20 सप्टेंबरपर्यंत "वंचित'ने भूमिका स्पष्ट करू नये, असे आवाहन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

'वंचित'चा असा होता प्रस्ताव 
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील 288 पैकी 144 जागा द्याव्यात आणि मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा असावा. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी अथवा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे की नाही, याबाबत कॉंग्रेसने भूमिका स्पष्ट करावी, राष्ट्रवादीला वगळून वंचित बहुजन आघाडीला कॉंग्रेसने सोबत घ्यावे, असा अनपेक्षित प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसला दिला. त्यावर अद्याप निर्णय झाला नसून याबाबत उद्या (शनिवारी) ऍड. आंबेडकर अंतिम निर्णय घेणार आहेत. 

लक्ष्मण मानेंनी वंचितांना सोडले 
लोकसभा निवडणुकीपूर्वी समाजातील वंचित घटकांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत मरेपर्यंत राहू, कॉंग्रेससह भाजप, राष्ट्रवादीने वंचितांना स्वातंत्र्यापासून उपेक्षितच ठेवल्याची भाषा करणारे माजी आमदार लक्ष्मण माने यांनी "वंचित'ची साथ सोडली.

दरम्यान, त्यांनी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेससमवेत जावे, असा हट्ट ऍड. प्रकाश आंबेडकरांकडे धरला. मात्र, तत्त्वाशी प्रामाणिक असल्याचे सांगत ऍड. आंबेडकरांनी कॉंग्रेसला आपला प्रस्ताव दिला. तो प्रस्ताव मान्य होणार नसल्याचे ओळखून माने यांनी स्वतंत्र चूल मांडली  आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com