भंडारा-गोंदियाच्या प्रचाराकडे कॉंग्रेस नेत्यांची पाठ? राष्ट्रवादीचे नेते मात्र प्रचारात

भंडारा-गोंदियाच्या प्रचाराकडे कॉंग्रेस नेत्यांची पाठ? राष्ट्रवादीचे नेते मात्र प्रचारात

नागपूर : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राज्यातील काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरविली आहे. प्रचाराची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसवर अवलंबून आहे. काँग्रेसच्या प्रचाराची धुरा माजी खासदार नाना पटोले यांनाच पार पाडावी लागत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व इतर नेत्यांनी अद्यापही भंडारा-गोंदियात प्रचार केलेला नाही. 

काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी गोंदियात तळ ठोकला आहे. गोंदियातील काँग्रेसचे आमदार गोपाल अग्रवाल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे विरोधक मानले जातात. गोपाल अग्रवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे यांच्याविरोधात कारवाया करू नये, यासाठी काँग्रेस पक्षाने सुनील केदार यांना गोंदियात तळ ठोकून राहायला सांगितले आहे. आमदार केदार सध्या गोंदियात थांबून आहेत. त्यांच्याशिवाय काँग्रेसचे इतर नेते गोंदियात फिरकले नाहीत.

राष्ट्रवादीचे नेते प्रचारात
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आज (ता. 22) नागपुरात येत आहेत. धनंजय मुंडे आज सायंकाळी भंडारा येथे जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येत्या 25 मे रोजी भंडाऱ्याला जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जयंत पाटील पहिल्यांदाच येत्या 25 मे रोजी विदर्भात येत आहेत. पूर्व विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेचा आढावा ते घेतील. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येत्या 25 मे रोजी सकाळी 10 वाजता नागपुरात येत आहेत. त्यानंतर सकाळी 11 वाजता ते नागपूर, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्याच्या संघटनेच्या आढावा घेणार आहेत. 

या भागात राष्ट्रवादी काँग्रेस संघटनात्मकदृष्ट्या कमजोर आहे. या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार नाही. काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने चांगली कामगिरी केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख जवळपास 20 वर्षे मंत्री राहिल्यानंतरही पक्षाच्या वाढीसाठी फारसे प्रयत्न केलेले नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अनिल देशमुख यांच्याबद्दल नाराजी आहे. यामुळे जयंत पाटील यांनी या भागात पक्ष वाढीसाठी गांभीर्याने प्रयत्न करण्याचे ठरविले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com