...उद्या माझीही चौकशी लावून तुरुंगात टाकले तर आश्चर्य नको : पृथ्वीराज चव्हाणांची टीका

'चिदंबरम्‌ झाले, पवारसाहेब झाले...आता उद्या माझी काही तरी चौकशी लावून मला तुरुंगात टाकले तर आश्‍चर्य वाटायला नको. पण माझी तुरूंगात जायची मानसिक तयारी झाली आहे. वाचायला पुस्तक आणि औषधांच्या बाटल्या जवळ असल्यावर कुठेही जायला मी तयार आहे.''
Prithviraj Chavan
Prithviraj Chavan

सातारा : ''चिदंबरम्‌ झाले, पवारसाहेब झाले...आता उद्या माझी काही तरी चौकशी लावून मला तुरुंगात टाकले तर आश्‍चर्य वाटायला नको. पण माझी तुरूंगात जायची मानसिक तयारी झाली आहे. वाचायला पुस्तक आणि औषधांच्या बाटल्या जवळ असल्यावर कुठेही जायला मी तयार आहे.''

कॉंग्रेसच्या कऱ्हाड दक्षिणेतील बुथ कमिटीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कऱ्हाड दक्षिणेतील कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात सातारा लोकसभा लढण्याच्या निर्णयावर पृथ्वीराज चव्हाण काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ''देश, लोकशाही आणि पक्ष संकटात आहे. सध्याचे केंद्रातील सरकार लोकशाही संपवायला निघाले आहे. चौकशी अस्त्राचा वापर करून ऐन केन प्रकाराने साम, दाम, भेद, दंड वापरून कुणाला ईडीची भिती दाखवून विरोधी पक्ष संपवायचा प्रयत्न सुरू आहे. पण कॉंग्रेसच्या विचारावर लोक थांबलेले आहेत. सोनिया गांधी, मनमोहन सिंग आम्ही सर्वजण चिदंबरम्‌ यांना भेटायला गेलो होतो. 2008 ची घटना आणि 2016 मध्ये आरोपपत्र दाखल केले, त्यामध्ये चिदंबरम्‌ यांचे नाव नाही. आता आरोप पत्र दाखल केले आहे. तिहार जेलमध्ये त्यांना सतरंजीवर झोपायला लावले. साधी खुर्ची बसायला दिली. डाळ नसलेली आमटी आणि सुकलेल्या चपात्या दिल्या.''

त्यांनी काय खून केला आहे का, असा प्रश्‍न करून चव्हाण म्हणाले, ''त्यांना सोडले तर ते देश सोडून पळून जाणार काय. काल परवा तर अकरा हजार कोटींच्या ठेवी असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेत्यांवर 25 हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला. गेली पाच वर्षे तुम्ही काय केले. निवडणुकीच्या तोंडावर याचिका दाखल केली. सगळ्या संचालकांनी वकिल दिलेत. सरकारने व पोलिसांनी बाजू मांडली. देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे, त्यांनी 25 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे पुरावे द्यावेत. दहशत दाखविण्याकरिता इतक्‍या खालच्या पातळीवर जाऊ नका.''

''चिदंबरम्‌ झाले, पवारसाहेब झाले आता उद्या माझी काही तरी चौकशी लावून मला तुरंगात टाकले तर अश्‍चर्य वाटायला नको. पण माझी तुरूंगात जायची मानसिक तयारी झाली आहे. वाचायला पुस्तक आणि औषधांच्या बाटल्या जवळ असल्यावर कुठेही जायला मी तयार आहे. ही विचारांची लढाई आहे. कोण कुठेही जाऊ देत आपल्या भागातील कोण कोण गेलय हे आपल्याला माहिती आहे. अविनाश मोहितेंना चार महिने तुरूंगात टाकले होते. कारवाई करून भिती दाखविली जात आहे. म्हणूनच देश संकटात आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे. बेरोजगारी वाढली आहे. मोदी खोटे बोलून जनतेच्या भावनेला हात घालत आहे. त्यांच्याकडून भावनिक ध्रुवीकरण सुरू आहे. यातून जाती, धर्म एकमेकांवर आक्रमण करतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.'' असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

चव्हाण पुढे म्हणाले, ''गेल्या पाच वर्षात मतदारांनी माझ्यावर प्रेम केले आहे. प्रत्येक गावात पाच, दहा, 15 कोटींची कामे केली आहेत. एकही गाव कामांपासून वंचित राहिलेले नाही. मला संधी देऊन हात बळकट केले. राजकारण नेतृत्व तयार करावे लागते, जपावे लागते. तळहातातील फोडाप्रमाणे जपावे लागते. तर नेतृत्वाकडून फायदा होतो. राजकारणात नियम आहे. सतत निवडुन दिले तोच नेता देशाचे नेतृत्व करू शकला आहे. निर्णायक घडी आली आहे. ही निवडणुक विचारांची आहे. पक्ष, नेतृत्व व तुमच्या सर्वांची इच्छा जाणून घेतली असून आपण सर्वांनी मिळून योग्य निर्णय घ्यायचा आहे. ही ऐतिहासिक लढाई असून योग्य निर्णय घेतला नाही तर कॉंग्रेस पक्ष राहणार नाही. हे सरकार बहुजन, शेतकरी विरोधी आहे.'' 

''कऱ्हाडच्या लोकांचे प्रेम विसरू शकत नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपण वाटचाल करताना जिल्हा बळकट करण्याचा विडा उचलून जो निर्णय वरून होईल. तो कऱ्हाडच्या मतदारांना केंद्र बिंदू मानून होईल. दोन तारखेला महात्मा गांधी यांची 150 वी जयंती आहे. कॉंग्रेस पक्ष व देशाकरिता राष्ट्रपितांना आदरांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्यने आपण सहभागी होऊन निर्णय घेऊ. या महाराष्ट्रातील क्रांतीची सुरवात प्रितीसंगमावरून यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन करूया. आपल्यासोबत कार्यकर्त्यांची ताकद आहे. त्यामुळे नवीन कॉंग्रेस निर्माण करून महाराष्ट्राच्या राजकारणाचे आणि शेतकऱ्यांचे झालेले वाटोळे करणाऱ्यांना दूर करूया.''असे आवाहनही चव्हाण यांनी यावेळी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com