नागपूर महानगरपालिकेत कॉंग्रेस गलितगात्र, मनपातील नेत्यांचे डोकेही चालेना

महापालिकेत झोन सभापती निवडणुकीत आशीनगर झोनमध्ये कॉंग्रेसला बसपमधील नाराज सदस्यांना घेऊन ताबा मिळविण्याची संधी होती. परंतु, लोकसभा निवडणुकीतील पराभवाने मनपात कॉंग्रेस गलितगात्र झाल्याचे दिसते. मंगळवारी झोनमध्येही कॉंग्रेसच्या नगरसेविकेने भाजपचे समर्थन घेत सभापतिपद मिळवले. परंतु, या नगरसेविकेला साधा जाब विचारण्याचीही तसदी घेतली गेली नाही. त्यामुळे मनपातील नेत्यांनी कॉंग्रेस भाजपच्या दावणीला तर बांधली नाही ना, अशी चर्चा रंगली आहे.
नागपूर महानगरपालिकेत कॉंग्रेस गलितगात्र, मनपातील नेत्यांचे डोकेही चालेना

नागपूर : महापालिकेत झोन सभापती निवडणुकीत आशीनगर झोनमध्ये कॉंग्रेसला बसपमधील नाराज सदस्यांना घेऊन ताबा मिळविण्याची संधी होती. परंतु, लोकसभा निवडणुकीतील पराभवाने मनपात कॉंग्रेस गलितगात्र झाल्याचे दिसते. मंगळवारी झोनमध्येही कॉंग्रेसच्या नगरसेविकेने भाजपचे समर्थन घेत सभापतिपद मिळवले. परंतु, या नगरसेविकेला साधा जाब विचारण्याचीही तसदी घेतली गेली नाही. त्यामुळे मनपातील नेत्यांनी कॉंग्रेस भाजपच्या दावणीला तर बांधली नाही ना, अशी चर्चा रंगली आहे.

महापालिकेच्या दहाही झोनच्या सभापतिपदाची निवडणूक शनिवारी झाली. दहापैकी आठ झोनमध्ये भाजपने थाटात बिनविरोध सभापती निवडून आणले. मंगळवारी झोनमध्ये नाट्यमय चित्र बघायला मिळाले तर आशीनगर झोन सभापतिपदावर बसपने ताबा मिळविला. या निवडणुकीत कॉंग्रेसकडून कुठलीही तयारी नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले. मंगळवारी झोनमध्ये कॉंग्रेसचे पाच, बसपाचे तीन तर भाजपचे आठ सदस्य आहेत. पाच सदस्य असल्याने कॉंग्रेस येथे निवडणुकीत भाजपपुढे आव्हान उभे करू शकत होती. परंतु, कॉंग्रेस नगरसेविका गार्गी चोप्रा यांना हाताशी धरून भाजपने बाजी मारली. भाजपने चोप्रा यांना समर्थन देत सभापतिपदही दिल्याने कॉंग्रेसची लोकसभा पराभवानंतर उरलेली पतही गेल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे. 

शिल्लक चार नगरसेवक याप्रकरणी संताप व्यक्त करण्यापलीकडे काहीही करू शकले नाही. यावरूनच महापालिकेतील काही कॉंग्रेस नेत्यांनी कॉंग्रेसला भाजपच्या दावणीला बांधल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे गार्गी चोप्रा यांनी पक्षातील नेत्यांशी चर्चा केली नाही. त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ कारवाईची अपेक्षा संदीप सहारे व इतर ज्येष्ठ नगरसेवकांनी व्यक्त केली. परंतु, सभापतिपदाची निवडणूक झाल्यानंतर विरोधी पक्षनेते महापालिकेकडे फिरकले नाही. गार्गी चोप्रा यांना सभापतीपद देण्याची रणनीती भाजपने आखली. परंतु, या रणनीतीत मनपातील कॉंग्रेस नेत्यांचाही सहभाग असल्याची शंका काही कॉंग्रेस नगरसेवकांनी व्यक्त केली.

आशीनगर झोनमध्ये बसपाचे सात तर कॉंग्रेसचे सहा सदस्य आहेत. यात लोकसभा निवडणूक लढलेले मनपातील बसपचे गटनेते मोहम्मद जमाल यांचाही समावेश आहे. मोहम्मद जमाल यांना नुकतेच पक्षातून काढले असून, त्यांनीही त्यानंतर पक्षातील नेत्यांवर आगपाखड केली. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्यापुढे समर्थनाचा प्रस्तावही ठेवला होता, असे कॉंग्रेसमधील सूत्राने सांगितले. जमाल यांची मदत घेऊन किंवा जमाल यांना मदत करून कॉंग्रेसला आशीनगर झोनमध्ये ताबा मिळविण्याची संधी होती. परंतु, येथेही कुठलीही रणनीती दिसून न आल्याने लोकसभा निवडणुकीतील पराभवाने कॉंग्रेस नेत्यांची डोकेही चालेनासे झाल्याचे बोलले जात आहे.

सभापतिपदाच्या निवडणुकीवर कॉंग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. मंगळवारी झोनमध्ये झालेल्या घटनेने चार नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. आशीनगरसह मंगळवारी झोनमध्येही कुठलीच तयारी न केल्याने कॉंग्रेस नगरसेवकांचा एक गट विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या राजीनाम्याची मागणी करू लागला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com