औरंगाबाद शहरातून कॉंग्रेस हद्दपारीच्या उंबरठ्यावर !

congress_.
congress_.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा कधीकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. गेल्या काही वर्षात या बालेकिल्ल्याची वाताहत झाली असून, शहरातून तर कॉंग्रेस पक्ष हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.

पूर्व मतदारसंघ समाजवादी पक्षासाठी सोडण्यात आला असून, "पश्‍चिम' बाबतही अद्याप अनिश्‍चितता आहे. तसेच जिल्ह्यातील पाच जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला देण्यात आल्या आहेत. कॉंग्रेस नऊपैकी फक्त दोनच जागा लढण्याची शक्‍यता आहे.
 


विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने दोन याद्या जाहीर केल्या. त्यात जिल्ह्यातील एकमेव फुलंब्री मतदारसंघाचा समावेश आहे. माजी आमदार कल्याण काळे यांना फुलंब्रीतून उमेदवारी देण्यात आली आहे.

बुधवारी (ता. दोन) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी औरंगाबाद शहर पूर्व मतदारसंघ समाजवादी पक्षाला सोडल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता कॉंग्रेसकडे जिल्ह्यातील फक्त तीनच जागा राहण्याची शक्‍यता आहे.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला झुकते माप देण्यात आले.

कॉंग्रेसकडे पश्‍चिम, सिल्लोड, फुलंब्री हे तीनच मतदार संघ दिले असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसला कन्नड, पैठण, वैजापूर, गंगापूर आणि मध्य हे पाच मतदार संघ सोडले आहे. त्यामुळे कॉंग्रेसची जिल्ह्यात मोठी वाताहत झाल्याचे बोलले जाते. लोकसभा निवडणुकीतही कॉंग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांचे डिपॉझिट जप्त झाले होते.

दोनच जागा लढणार!

पश्‍चिम विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसकडे असला तरी तो रिपब्लिकन डेमॉक्रॅटिक पक्षाला सोडण्यात यावा, अशी मागणी होत आहे. या मतदारसंघात गेल्यावेळी कॉंग्रेसला अत्यल्प मते मिळाली होती तर दुसरीकडे रिपाइंचे रमेश गायकवाड यांनी मतदारसंघात चांगली बांधणी केली आहे. विजयाची सुतराम शक्‍यता नसल्याने कॉंग्रेसतर्फे उमेदवारी घेण्यास कोणी तयार नसल्याचे चित्र आहे.

कॉंग्रेसने पूर्व मतदारसंघाची जागा समाजवादी पक्षाला सोडली असली तरी तिथे उमेदवार कोण? हे गुलदस्त्यात आहे. गुरुवारी (ता. तीन) हे नाव जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

बाळासाहेब थोरातांना पत्र


जिल्ह्यात कॉंग्रेसची झालेली दयनीय अवस्था आणि नेत्यांनी केलेले दुर्लक्ष याकडे लक्ष वेधण्यासाठी कॉंग्रेस अनुसिचत जाती-जमाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र देहाडे यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मेलवर पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.

या पत्रात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या वाट्याला असलेल्या जागा न लढण्याच्या किंवा मित्रपक्षाला सोडण्याच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल अशाने खचेल, विधानसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. मग आपण कोणत्या तोंडाने त्याला सामोरे जाणार असा प्रश्‍न देहाडे यांनी उपस्थित केला आहे.

कॉंग्रेसकडे असलेले पुर्व आणि पश्‍चिम या मतदारसंघात पक्षाने आपल्याच चिन्हावर लढावे. उमेदवारी कुणालाही दिली तरी आम्ही कार्यकर्ते म्हणून त्या उमेदवारांचे तन-मन-धनाने काम करू आणि त्यांना निवडून  आणू असा शब्द देखील या पत्रात देण्यात आला आहे.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com