वसंतदादांच्या सांगलीत कॉंग्रेसची अस्तित्वाची लढाई; युवा नेत्यांची कसोटी

..
sangli_congress
sangli_congress

सांगली :   वसंतदादांची सांगली, कॉंग्रेसचा बालेकिल्ला... हा आता इतिहास झाला. बालेकिल्ला ढासळलाय. त्यावर भाजपचा झेंडा फडकलाय. आता पुन्हा तो बांधायचा असेल तर जिल्ह्याच्या राजकारणात अस्तित्व दाखवण्याचे आव्हान कॉंग्रेससमोर आहे. युवा नेतृत्वाच्या हातात पक्षाची धुरा आहे. गटबाजीचा इतिहास सोडून त्यांना अस्तित्वाची प्रामाणिक लढाई लढावी लागेल. ती लढतात का, यातच कॉंग्रेसचे भवितव्य दडलेले आहे.  

आमदार विश्‍वजित कदम, विशाल पाटील या दोन प्रमुख नेत्यांवर जिल्ह्याची जबाबदारी आहे. त्यांचा जिल्ह्यात संपर्क आहे. स्वतंत्र गट आहेत. परंतु विधानसभा निवडणुकीतील यशावरच त्यांचे राजकारण अवलंबून असणार आहे. गट-तट विसरून ते एकसंधपणे कसे राबतात, याकडे कॉंग्रेसजणांचे लक्ष आहे. त्यांच्या नेतृत्वाची ही कसोटीच ठरणार आहे.  

 वसंतदादा सांगलीत बसून राज्यातील उमेदवार ठरवायचे. त्याच दादांच्या नातवाला, विशाल पाटील यांना काल सांगलीची उमेदवारी जयश्री पाटील यांना देताय की वेगळा विचार करू, असा निर्वाणीचा इशारा द्यावा लागला. लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत स्वाभिमानीची उमेदवारी स्वीकारावी लागल्यानंतर उशिरा का असेना कॉंग्रेसला जाग आली आहे.
 या वर्तमानाचा धागा उसवत भूतकाळात नेला तर समृद्ध, संपन्न कॉंग्रेसच्या पाऊलखुणा दिसतात. ढासळलेल्या किल्ल्यांत त्या खुणाच शिल्लक रहाव्यात, अशी कॉंग्रेसची स्थिती आहे. सैन्याने कधीच तळ सोडून विरोधी गटात उडी घेतली आहे. त्यातून आता कॉंग्रेस कशी उभी राहते, याची निकराची लढाई विधानसभेला आहे. या लढाईला रसद आणि लढाऊ चेहऱ्याची गरज आहे. राज्य पातळीवरही त्याचीच उणीव आहे.

वसंतदादा राजस्थानचे राज्यपाल झाल्यानंतर सांगलीची पोटनिवडणूक लागली, त्यात विष्णूअण्णांना पराभूत करून जनता दलाचे संभाजी पवार आमदार झाले. तेव्हा प्रथम दादांचा गड ढासळला. तो सांगलीपुरता होता, पण येथे कॉंग्रेसला पुन्हा फक्त एकदा सावरता आले. 1999 ला दिनकर पाटील यांचा अपवाद वगळता कॉंग्रेसचा पंजा चालला नाही. 

राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि निम्म्याहून अधिक कॉंग्रेस रिकामी झाली. त्यानंतर आलेख खाली येत राहिला. 2004 ला जतमध्ये पहिले कमळ फुलले, 2009 ला सांगली, मिरज, जतमध्ये भाजप आली आणि आता चार भाजप, एक शिवसेना अशी परिस्थिती आहे. कॉंग्रेसचे फक्त एक आमदार आहे.

2014 नंतर पक्षाला संकटांची मालिकाच पहावी लागली. पतंगराव कदम, मदन पाटील, शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली. कॉंग्रेसला नेतृत्व उरले नाही. वसंतदादा गट आणि कदम गट संघर्ष पुढे सुरू राहिला, तो आता संपल्याचा दावा केला जातो, मात्र विधानसभेला ते अधिक स्पष्ट होईल. 2014 ला लोकसभेत मोदी लाटेत दादांचे नातू प्रतीक पाटील आणि 2019 ला विशाल पाटील यांचा पराभव झाला. सांगलीचा दिल्लीतील आवाज थांबला.

दादांच्या पश्‍चात पतंगराव कदम, मदनभाऊ पाटील, शिवाजीराव देशमुख यांनी जिल्ह्याबरोबर राज्यात नेतृत्व केले. मंत्रिपदावर नेहमीच हक्क ठेवला. भाजपने जिल्ह्यात शिरकाव केल्यावरही पतंगराव आणि मदनभाऊंचा प्रभाव  होता. कॉंग्रेसची पाळेमुळे खोलवर रुजली होती. गाव पातळीवरील केडर ही कॉंग्रेसची खरी ताकद. आमदार भले भाजपचे असतील, पण महापालिका, जिल्हा बॅंक, बाजार समिती, ग्रामपंचायत, सोसाट्यांवर हाताची पकड कायम होती. भाजपने नेमक्‍या त्या यंत्रणेला हात घातला आणि कॉंग्रेसचा हात ढिला पडत गेला.

आता आर पारची लढाई लढावी असेल. विश्‍वजित यांनी "माझ्या रक्तात कॉंग्रेस आहे', असे स्पष्ट करत प्रदेशचे कार्याध्यक्षपद स्वीकारले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नवी फळी तयार होतेय. विशाल पाटील यांचा गट मजबूत आहे, फक्त त्यांनी अधिक गांभीर्याने राजकारण करावे, अशी कॉंग्रेसजणांची अपेक्षा आहे. मदनभाऊ समर्थक गट कट्टर आहे. त्याचे दर्शन काल घडलेच. 

जतमध्ये विक्रम सावंत यांनी मजबूत बांधणी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा टोकाचा कॉंग्रेस विरोधही आता कमी झाला आहे, ही जमेची बाजू.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत 2009 नुसार सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, जत, खानापूर कॉंग्रेसकडे आहे. आमदार विश्‍वजित कदम यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

सांगलीत जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्यात उमेदवारीची चुरस आहे. जतमध्ये विक्रम सावंत यांचे नाव निश्‍चित मानले जातेय. सी. आर. सांगलीकर हेही प्रयत्नशील आहेत. मिरजेच्या उमेदवारीबाबत संभ्रम आहे. तेथे मंत्री सुरेश खाडेंच्या विरोधात आश्‍वासक चेहराच नाही. खानापुरातून माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना कॉंग्रेसमध्ये रोखून धरण्याचे आव्हान असेल. कॉंग्रेसला पुन्हा युवकांचा पक्ष बनवून जिल्ह्यावर पकड मिळवण्याचे खडतर आव्हान असून त्याची महत्त्वाची परीक्षा तोंडावर आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com