कॉंग्रेसचा मुड बदलला; औरंगाबाद महापालिका स्वबळावर लढणार

स्थानिक कॉंग्रेस नेते व जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष नामदेव पवार, प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची शिवसेनेने दगाबाजी केल्याची भावना झाली. त्याचे पडसाद रविवारी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कॉंग्रेसच्या गांधी भवन येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत उमटले
Congress Will Fight Aurangabad Corporation Election on Its Own
Congress Will Fight Aurangabad Corporation Election on Its Own

औरंगाबाद :  नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांनतर विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने हात दाखवल्यामुळे कॉंग्रेसचे स्थानिक नेते संतापले आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देतांना शिवसेनेने भाजपशी हातमिळवणी केली, सभापती पदाच्या निवडणुकीत देखील कॉंग्रेसला पद मिळू दिले नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवत शिवसेनेला धडा शिकवण्याची तयारी कॉंग्रेसने सुरू केली आहे.

एप्रिलमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या तयारी सगळेच राजकीय पक्ष लागले आहेत. राज्यात शिवसेना- कॉंग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तारूढ झाले. त्यानंतर लगेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या महापालिका, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापती निवडणुकीत महाविकास आघाडीला झाला. औरंगाबाद जिल्हा परिषदेत मात्र शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून महाविकास आघाडीला खो देण्यात आला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वेगळी भूमिका घेत सत्तार यांनी शिवसेनेचाच अध्यक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण ईश्‍वर चिठ्ठीने सत्तारांचे मनसुबे उधळले गेले. त्यानंतर विषय समिती सभापती पदाच्या वाटपात कॉंग्रेसला चांगले खाते मिळेल अशी अपेक्षा होती. पण ती देखील सत्तार यांनी फोल ठरवत आपल्या समर्थकांची वर्णी तिथे लावली.

स्थानिक कॉंग्रेस नेते व जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष नामदेव पवार, प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची शिवसेनेने दगाबाजी केल्याची भावना झाली. त्याचे पडसाद रविवारी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कॉंग्रेसच्या गांधी भवन येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत उमटले.

शिवसेनेविरुध्द आक्रमक धोरण..

महाविकास आघाडी झालेली असतांना आणि वरिष्ठांनी तसे आदेश दिलेले असतांना देखील शिवसेनेच्या एका मंत्र्याने मनमानी केली, आणि वरिष्ठ पातळीवर देखील त्याला अभय देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डॉ. कल्याण काळे यांनी आपले राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. महाविकास आघाडीला अध्यक्षपद देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश देखील येणार होते. पण कॉंग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले आणि सध्या राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी आपले जुने हिशेब चुकते करण्याचे ठरवले आणि काळेंचा डाव फसला.

त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत न जाता स्वबळावर लढवण्याचा निर्धार कॉंग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. या निवडणुकीत शिवसेनेने महापालिकेत केलेला भ्रष्टाचार हाच प्रमुख मुद्दा करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे. शहरातील नागरी प्रश्‍न सोडवण्यात सत्ताधाऱ्यांना आलेले अपयश, भ्रष्टाराचाराचे आरोप असे मुद्दे लोकांसमोर मांडून वेगळा पर्याय म्हणून कॉंग्रेसचा विचार केला जावा असे आवाहन प्रचारा दरम्यान करण्यात येणार आहे.

अर्थात महापालिका निवडणुक स्वबळावर लढायची? की महाविकास आघाडीत याचा निर्णय राज्यपातळीवर वरिष्ठ नेत्यांकडून घेतला जाणार आहे. पण स्थानिक नेत्यांशी चर्चा करूनच तो होणार असल्याने महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहणार की? तिचे शकले उडणार हे लवकरच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com