कॉंग्रेस : सर्व सेनापती एकत्र आणण्यात अपयश

कॉंग्रेसपुढचे सर्वांत मोठे आव्हान आहे, देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रचाराची धुमाळी उडवून देण्याचे, गटातटांना एकत्र बांधून ठेवण्याचे आणि पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे ओझे थोडे हलके करण्याचे. सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात अशा ज्येष्ठांकडे त्या दृष्टीने पाहता येईल; परंतु अशी ज्येष्ठांची मोट बांधलेली नाही.
कॉंग्रेस : सर्व सेनापती एकत्र आणण्यात अपयश

तराव्या लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणूक जाहीर होताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेस पक्षावर अनवस्था प्रसंग आणला आहे. देशभर ज्यांच्याविरुद्ध सर्व शक्‍तिनिशी लढायचे त्या भारतीय जनता पक्षाकडूनच नगरची उमेदवारी मुलगा डॉ. सुजय विखे यांना मिळविण्याच्या त्यांच्या धावपळीने सगळ्यांना पाच महिन्यांपूर्वीचा छत्तीसगडमधील प्रसंग आठवला असेल. कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदयाल उईके असे निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये दाखल झाले होते. निवडणूक निकालाने ते पक्षांतर विस्मरणात गेले. कारण, कॉंग्रेसने भाजपची पंधरा वर्षांची सत्ता उलथवून टाकली. 90 पैकी 68 जागा जिंकल्या. उईके यांच्या पक्षांतरामुळे बसलेल्या धक्‍क्‍यातून बाहेर काढणारा संघटक भूपेश बघेल यांच्या रूपाने पक्षाला लाभला होता. विखे पाटील यांच्यामुळे असेच विश्‍वासार्हतेचे आव्हान महाराष्ट्रात कॉंग्रेसपुढे उभे राहिले असताना पक्ष एकत्र बांधून ठेवून विजयाकडे कूच करणारे कुणी बघेल मात्र नजरेच्या टप्प्यात नाहीत.

शेती-शेतकरी, बेरोजगारी, राफेल विमान खरेदी करार, त्यातील अनिल अंबानींच्या कंपनीचे नाव असे अनेक मुद्दे निवडणूक प्रचारात कॉंग्रेसच्या मदतीला आहेत. थोडा आक्रमक प्रचार केला तर पुलवामा दहशतवादी हल्ला आणि भारतीय वायूदलाने पाकिस्तानातील अतिरेकी संघटनांना दिलेले चोख उत्तर हे मुद्देदेखील मतदारांना पक्षाकडे वळविण्यासाठी साहाय्यभूत ठरतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत शनिवारी केलेल्या भाषणाने ते दाखवून दिले आहे; पण कॉंग्रेसपुढचे सर्वांत मोठे आव्हान आहे, देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रचाराची धुमाळी उडवून देण्याचे, गटातटांना एकत्र बांधून ठेवण्याचे आणि पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे ओझे थोडे हलके करण्याचे. सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात अशा ज्येष्ठांकडे त्या दृष्टीने पाहता येईल; परंतु अशी ज्येष्ठांची मोट बांधलेली नाही. धारणा, धोरण व निर्णयासाठी शरद पवारांकडे धावत जाणे एवढेच कॉंग्रेसच्या हातात आहे.

असे म्हणतात, कॉंग्रेसला बाहेरच्या शत्रूंची गरज नसते. त्याची प्रचिती येऊ घातलीय. कॉंग्रेसच्या वाट्याच्या सव्वीस जागांपैकी मुंबईतल्या पाच जागांचे भवितव्य गुरुदास कामत यांच्या पश्‍चात संजय निरूपम यांच्यावर अवलंबून आहे. मिलिंद देवरा, प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड यांनी कसेबसे गड राखले तरी खूप. मुंबईबाहेरच्या एकवीस जागांपैकी पालघर, भिवंडी, पुणे, औरंगाबाद, जालना, अकोला, नागपूर अशा बऱ्याच मतदारसंघांमध्ये पक्षाकडे सक्षम उमेदवार नाही. सोलापूर, धुळे, नांदेड, यवतमाळ या मोजक्‍या जागा सोडल्या तर अन्य ठिकाणी पक्षांतर्गत टोकाची भांडणे आहेत. प्रदेशाध्यक्ष नात्याने सगळे सेनापती एकत्र आणण्यात अशोक चव्हाण अपयशी ठरले आहेत आणि प्रदेश नेतृत्त्वामध्ये प्रयोग करण्याची वेळ निघून गेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com