Congress Demands Actions Against own Corporators | Sarkarnama

भिवंडीच्या 18 फुटीर नगरसेवकांवर कारवाईसाठी कॉंग्रेस नगरसेवकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

भिवंडी महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा 18 नगरसेवकांनी घोडेबाजाराला बळी पडून पक्षाशी दगाबाजी करून कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मतदान केले. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे

भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा 18 नगरसेवकांनी घोडेबाजाराला बळी पडून पक्षाशी दगाबाजी करून कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार रिषीका राका यांचा दारुण पराभव झाला. महापालिकेत कॉंग्रेस पक्षाचे बहुमत असतानाही नामुष्की ओढवल्याने 18 फुटीर नगरसेवकांचे पद कायमचे रद्द करण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेस नगरसेवकांचा एका शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयात भेट घेऊन केली आहे.

भिवंडी शहर महानगरपालिकेत शिवसेना व कॉंग्रेस पक्षाची युती आहे. महापालिकेत कॉंग्रेस पक्षाचे 47 व शिवसेनेचे 12 नगरसेवक असल्याने बहुमत आहे.असे असताना महापौर व उपमहापौर पदासाठी 5 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा 18 नगरसेवकांनी पक्षादेश झुगारून भाजप व कोणार्क विकास आघाडीच्या महापौर पदाच्या उमेदवारास मतदान केले. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार रिषीका राका दारुण पराभव झाला. या घटनेमुळे कॉंग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली असून गटबाजीला उधाण आले आहे.

त्यामुळे ही गटबाजी व अंतर्गत फूट रोखण्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल मंत्रालयात भेट घेऊन कॉंग्रेस पक्षाचा पक्षादेश झुगारून विरोधकांना मदत करणाऱ्या 18 नगरसेवकांचे नगरसेवक पद तात्काळ रद्द करण्यासाठी कोकण आयुक्तांना आदेश देण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेसचे पालिका सभागृह नेता प्रशांत लाड यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या नगरसेवकांच्या मंडळाने केली आहे.

या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फुटीर नगरसेवकांवर येत्या 15 दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन कॉंग्रेस शिष्टमंडळाला दिल्याची माहिती सभागृह नेता प्रशांत लाड यांनी दिली. दरम्यान, कोकण आयुक्तांच्या आदेशावरून भिवंडी महापालिकेच्या नगरसचिव विभागाने कॉंग्रेस पक्षाचा आदेश झुगारणाऱ्या 18 नगरसेवकांना नोटीस बजावून 16 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कोकण भवन येथे हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख