काॅंग्रेसचा इंधन दरवाढी निषेधार्थ १० सप्टेंबरला भारत बंद : राष्ट्रवादीचाही पाठिंबा

काॅंग्रेसचा इंधन दरवाढी निषेधार्थ १० सप्टेंबरला भारत बंद : राष्ट्रवादीचाही पाठिंबा

नवी दिल्ली : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेसने 10 सप्टेंबरला (सोमवारी) भारत बंद ची घोषणा केली आहे. सरकारने साडेचार वर्षात जनतेकडून लुटलेले 11 लाख कोटी रुपये कुणाच्या खिशात गेले, असा सवालही कॉंग्रेसने केला आहे. भारत बंदला सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्याचे कॉंग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे. 

कॉंग्रेसचे सर्व सरचिटणीस, प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांची आज दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर सरकारला इंधन दरवाढीवरून घेरण्याची घोषणा करण्यात आली. पत्रकारांशी बोलताना संघटना सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या कडाडलेल्या दरावरून मोदी सरकारवर हल्ला चढवला. तसेच येत्या सोमवारी (ता. 10 सप्टेंबर) भारत बंद दरम्यान देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवर सकाळी नऊ ते दुपारी तीन दरम्यान कॉंग्रेसचे कार्यकर्ते निदर्शने करतील, असेही स्पष्ट केले. 

पेट्रोलचा दर 80 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 72 रुपये प्रतिलिटर वर जाऊन पोहोचला असून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचेही दर गगनाला भिडले आहेत. गेल्या साडेचार वर्षात सरकारने जनतेकडून 11 लाख कोटी रुपये कमावले असल्याचा आरोप मुख्यप्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला. तसेच पेट्रोल आणि डिझेल जीएसटी अंतर्गत आणावे, या पक्षाच्या मागणीचा पुनरुच्चार केला. 

वरिष्ठ नेते आणि खजिनदार अहमद पटेल यांनी कॉंग्रेसच्या आंदोलनाला सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. तृणमूल कॉंग्रेस निदर्शनांमध्ये सहभागी होणार आहे. मात्र, भारत बंद पुकारणार नसल्याचे तृणमूल कॉंग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे. तर बहुजन समाज पक्षाशी पाठिंब्यासाठी बोलणी सुरू आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार, समाजवादी पक्ष, डाव्या पक्षांनीही पाठिंबा जाहीर केला असल्याचे अहमद पटेल म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com