Congress BJP Make in Maharashtra Make in India | Sarkarnama

'मेक इन महाराष्ट्र नाही, फेक इन महाराष्ट्र' 

कुणाल जाधव
शनिवार, 4 मार्च 2017

राज्य सरकाराच्या अपयशाचा सविस्तर वृत्तान्त या पुस्तिकेत छपण्यात आला आहे. प्रकाशानानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून या पुस्तिकेच्या प्रती सामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. विविध ग्रंथालयांमध्येही पुस्तिका ठेवली जाईल. 
- डॉ. राजू वाघमारे, प्रवक्ता, काँग्रेस

मुंबई : निवडणुकीआधी भाजप आणि शिवसेनेने अनेक आश्‍वासने दिली होती. मात्र सत्ता मिळाल्यावर अडीच वर्षांच्या काळात एकाही आश्‍वासनाची पूर्तता न केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

राज्य सरकाराच्या उणीवा जनतेसमोर आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने एक विशेष पुस्तिका तयार करण्यात आली आहे. 'बदल दिसतोय, महाराष्ट्र बदलतोय' या शीर्षकेच्या या पुस्तिकेत , 'मेक इन महाराष्ट्र नाही, फेक इन महाराष्ट्र' अशी टॅगलाईन आहे. लवकरच प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन केले जाणार आहे. 

भाजप सरकारने घेतलेल्या अनेक चुकीच्या निर्णयानंतरही तीव्र विरोध करण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसने आता सरकारचे अपयश पुस्तिकेच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्याचा चंग बांधला आहे. गेल्या अडीच वर्षांत राज्यात दररोज 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे करण्यात आलेल्या या आत्महत्या नसून या 'सरकारी हत्या' आहेत, असा आरोप या पुस्तिकेत करण्यात आले आहे.

राज्यात 7 लाख कोटींची गुंतवणूक झाल्याने 30 लाखांच्या वर रोजगार उपलब्ध होतील, असा दावा भाजपने केला होता. मात्र प्रत्यक्षात हे आकडे फसवे आहेत असा आरोपही यात करण्यात आला आहे. त्यामुळे 'मेक इन महाराष्ट्र नसून फेक इन महाराष्ट्र' आहे, असो टोला या पुस्तिकेत लगावला आहे.

तसेच राज्यातील वाढती बेरोजगारी, मराठा - मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात आलेले अपयश, कुपोषणाची समस्या, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, भ्रष्टाचारी मंत्र्यांना दिलेली क्‍लिन चीट, आरोग्य आणि परिवहन सेवेची परवड अशा अनेक विषयांवर विस्तृत लेख यात आहेत. तर नोटबंदीचा फसलेला निर्णय, काळा पैसा आणण्यात आलेले अपयश अशा केंद्रातील विषयांचाही समावेश करण्यात पुस्तिकेत करण्यात आला आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख