काँग्रेस शिवसेनेला होकार देईना , भाजप फायदा उठवणार  ? 

मात्र राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आता सरसंघचालक मोहन भागवतपुढाकार घेणार काय ?अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे .
devendra_uddhav
devendra_uddhav

मुंबई : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा  सोनिया गांधी यांना शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होणे किंवा  शिवसेनेला सरकारबाहेर राहून पाठिंबा देणे या दोन्ही गोष्टी मान्य नसल्याचे समजते . त्यामुळे शिवसेनेला बॅकफूटवर यावे लागण्याची चिन्हे आहेत .

मात्र शिवसेनेचा पाठिंबा असल्याशिवाय भाजपला सरकार स्थापन करता येणार नसल्याने भाजपला शिवसेनेची मनधरणी करावीच लागणार आहे . 


शिवसेनेने आधी एनडीए मधून बाहेर पडावे . शिवसेनेच्या  केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अ सलेल्या एकमेव मंत्र्याने  राजीनामा द्यावा . त्यानंतरच  सेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा द्यायचा किंवा नाही याबाबतचा विचार काँग्रेस पक्षातर्फे केला जाईल, असे सिग्नल्स  काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी दिलेले आहेत . 


काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्याबरोबर प्रदीर्घकाळ सत्तेत आणि पक्षात  काम केलेले महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वीच शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता फेटाळून लावली होती. 

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही चार दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना  काँग्रेस पक्षाचे  वरिष्ठ नेतृत्व शिवसेनेशी हातमिळवणी करण्यास तयार होईल का याविषयी शंका व्यक्त केली होती. 

 तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे शिवसेनेने प्रस्ताव पाठवलाच नाही अशी भूमिका जाहीरपणे घेतली होती . तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार किंवा नाही याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नव्हती .   या भूमिकेमुळे शिवसेनेला भाजपशी सौदेबाजी करण्यास काही कालावधी मिळाला .  

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीहून मंगळवारी मुंबईला येऊन दाखल झालेले आहेत . शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट झाली असली तरी त्यामध्ये काही ठरलेले नाही असे समजते . पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी भाजप आणि शिवसेना एकत्र आहेत त्यांनी लवकर धोरण ठरवावे अशा स्वरूपाचे विधान केले आहे . 


एकंदर झालेल्या घडामोडी आणि काँग्रेस हायकमांडचा नकारात्मक पावित्रा  पाहता काँग्रेस पक्षाचा शिवसेनेला सरकार स्थापन करण्यास पाठिंबा मिळेल ही शक्यता आता धूसर  झाली असल्याचे समजते. 


दरम्यान महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये हालचालींना आणि घडामोडींना वेग आलेला आहे . आज संध्याकाळी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील त्या दोघांमध्ये गुप्त बैठक झाली असल्याचे समजते. 

 या बैठकीमध्ये भाजपकडून शिवसेनेला गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम ही दोन खाती देण्यासंदर्भात प्रस्ताव पुढे करण्यात आला.  शिवसेना मात्र महसूल आणि गृहमंत्री पदावर ठाम असल्याचे समजते . तसेच शिवसेनेतील संजय राऊतआणि अन्य काही नेते  मुख्यमंत्रिपदाचा पेक्षा एक पाऊल मागे जायचे नाही याबाबत काही ठाम आहेत  असे समजते . त्यामुळे  आजची बोलाचाली फारशी पुढे जाऊ शकली नाही. 


दरम्यान आणखी एक महत्त्वाच्या घडामोडी मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असल्याचे समजते . या चर्चेमध्ये काय झाले हे अद्याप समजलेले नाही. 

 मात्र राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आता संघ पुढाकार घेणार काय ?  अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे . सरसंघचालक मोहन भागवत यांनी जर शब्द टाकला तर तो  उद्धव ठाकरे मान्य करतील की करणार नाहीत याबाबत चर्चा आहे.  मात्र मोहन भागवत यांचे शब्दाला असलेले महत्त्व लक्षात घेता भागवतांचा  शब्द टाळणे उद्धव ठाकरे यांना अडचणीची ठरू शकते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com