आंबेडकरांच्या विराट सभेमुळे उडाली कॉंग्रेसची झोप ...

आंबेडकरांच्या विराट सभेमुळे उडाली कॉंग्रेसची झोप ...

लातूर : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या लातूरमधील विराट सभेने कॉंग्रेसची झोप उडवली आहे. दलित व मुस्लिम हा कॉंग्रेसचा पारंपारिक मतदार आहे. हा मतदार आता ऍड. आंबेडकर यांच्या पाठीशी जातो की काय असे चित्र या सभेने निर्माण केले आहे. ऐन लोकसभेच्या तोंडावर ही सभा झाल्याने हा मतदार आपल्याकडे राहण्यासाठी कॉंग्रेसचे नेते काय पावले उचलतात याकडे आता लक्ष लागले आहे. 

लातूर हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला. सध्या माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्याकडे कॉंग्रेसचे नेतृत्व आहे. गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे संभाजी पाटील निलंगेकर यांचे नेतृत्व पुढे आले. त्यांनी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला धक्के दिले. लोकसभा मतदारसंघापासून सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था कॉंग्रेसच्या "हाता'तून घेत त्यावर "कमळ" फुलवले. त्यामुळे देशमुख विरुद्ध निलंगेकर असेच सामने लातूरकर पाहत आहेत. त्यात आता लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. 

लोकसभेचा सामना कॉंग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष असाच रंगणार आहे. असे असले तरी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी चार फेब्रुवारीला जाहीर सभा घेवून राजकीय निरीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. लातूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून ऍड. आंबेडकर यांनी येथे लक्ष घातले आहे. प्रत्येक वेळेस पत्रकार परिषद घेणे, एखाद्या तालुक्‍याला भेट देवून कार्यक्रम घेवून आपली भूमिका मांडत आले आहेत. 

आता तर त्यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. गेल्या महिन्यापासून त्याची तयारी सुरु करण्यात आली होती. शहरात फ्लेग्ज लावण्यात आले होते. ऍटोरिक्षाने त्याचा प्रचारही करण्यात आला होता. या सभेला एमआयएमचे नेते ओवेसी येणार असेही जाहिर करण्यात आले होते. दलित, मुस्लिम वस्त्यात या सभेचा अधिक प्रचार करण्यात आला होता. महाराष्ट्र विकास आघाडीचे ऍड. अण्णाराव पाटील यांनाही त्यांनी सोबत घेतले. लातूरचे टाऊन हॉलचे मैदान सभेसाठी प्रसिद्ध आहे. सभा दुपारी तीन वाजता 
सुरु होणार होती.पण ती साडे पाचला सुरु झाली. ती रात्री नऊ वाजेपर्यंत चालली. आतापर्यंत खुर्च्या टाकून हे मैदान भरवले जात होते. पण या सभेत एकही खुर्ची नव्हती. सर्वजण खाली बसले होते. 

सभेला तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात होता. टाऊन हॉलचे मैदान खचाखच भरले होते.त्यामुळे ही गर्दी पाहून ऍड. आंबेडकर यांनी माजी शिक्षणाधिकारी राम गारकर यांना लातूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून जाहिर केले. उमेदवार जाहीर करण्यात त्यांनी आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात कॉंग्रेससोबत वाटाघाटी झाल्या तरी लातूर मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न ऍड. आंबेडकर करतील असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटू लागले आहे. पण ऍड. आंबेडकर यांच्या या सभेच्या गर्दीमुळे कॉंग्रेसची मात्र झोप उडाली आहे. ही गर्दी पाहून भारतीय जनता पक्षाच्या गोटात मात्र फटाके फुटत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com