congress and bjp conflict in assembly | Sarkarnama

संसदेच्या प्रांगणातच मंत्री-खासदार बाचाबाची 

सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : "एनआरसी' नोंदवही आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरून भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी थेट दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींनाच पिंजऱ्यात उभे केल्याने कॉंग्रेस खासदारांचा इतका तिळपापड झाला, की कामकाज तहकूब झाल्यावरही अनेक कॉंग्रेस खासदार शहा यांच्यावर राग धरून बाहेर पडत होते. याचे पडसाद संसदेच्या प्रांगणातही उमटले. 

नवी दिल्ली : "एनआरसी' नोंदवही आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरून भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी थेट दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींनाच पिंजऱ्यात उभे केल्याने कॉंग्रेस खासदारांचा इतका तिळपापड झाला, की कामकाज तहकूब झाल्यावरही अनेक कॉंग्रेस खासदार शहा यांच्यावर राग धरून बाहेर पडत होते. याचे पडसाद संसदेच्या प्रांगणातही उमटले. 

ज्येष्ठ कॉंग्रेस खासदार प्रदीप भट्टाचार्य हे तर केंद्रीय मंत्री अश्‍विनीकुमार चौबे यांनाच भिडले! या दोघांतील जाहीर बाचाबाची चर्चेचा विषय झाली. राष्ट्रपित्याच्या पुतळ्याच्या साक्षीने बारा क्रमांकाच्या प्रवेशद्वाराबाहेरच या दोघांनीही परस्परांना यथेच्छ शाब्दिक बोचकारे काढले. 

राज्यसभेचे कामकाज बंद पडल्यावर चौबे "एनआरसी'च्या विषयावर एका वृत्तवाहिनीला बाईट देत होते तेव्हा त्यांच्या शेजारीच उभे असलेल्या भट्टाचार्य यांनी त्यांना, "तुम्ही काहीही उलटेपालटे बोलत आहात,' असे टोकले. त्यावर चौबे यांनी, "तुम्हीही बाईट देऊन तुमचे म्हणणे मांडा,' असे सांगितले.

पण भट्टाचार्य यांचा राग शांत होईना. ते म्हणाले, की मी बंगालचा आहे व आसामचा प्रश्‍न मला माहिती आहे. त्यावर चौबेही भडकले व त्यांनी, "मीदेखील बिहार- बंगालच्या सीमेवरचा आहे. घुसखोरांना तुम्ही कशाला पाठीशी घालता?' असा हल्ला चढविला. 

चौबे यांनी त्यांना "हू आर यू?' असा सवाल करताच भट्टाचार्य म्हणाले, "मी संसद सदस्य आहे. मला बोलण्याचा अधिकार आहे.' तेव्हा "मीही याच संसदेचा सदस्य आहे. तुम्ही वेगळा बाईट द्या व आमच्यावर टीका करा. मी तुमच्या मध्ये येणार नाही. जो भारताच्या बाजूचा आहे व देशाच्या एकतेसाठी बोलेले त्यालाच देशात ठेवले जाईल. मुस्लिमांच्या व बांगलादेशींच्या बाजूचे आहेत त्यांना या देशातून बाहेर हाकलण्यात येईल,' असे सांगत सांगत चौबे गाडीकडे जाऊ लागले तेव्हा भट्टाचार्य यांनी त्यांचा पाठलाग करीत तुम्ही देशाची दिशाभूल करत आहात, असे म्हणून टीका सुरू केली. त्यावर गाडीत बसता बसता चौबे यांनी, तुम्हाला देशातच ठेवले जाईल. काळजी करू नका, असे हसतहसत सांगितले व ते निघून गेले. 

मी बंगालचा आहे व आसामचा प्रश्‍न मला माहिती आहे. 
प्रदीप भट्टाचार्य, कॉंग्रेसचे ज्येष्ठ सदस्य 

मीदेखील बिहार- बंगालच्या सीमेवरचा आहे. घुसखोरांना तुम्ही कशाला पाठीशी घालता? 
अश्‍विनीकुमार चौबे, केंद्रीय मंत्री 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख