अर्थमंत्री मुनगंटीवारांच्या विरोधात उमेदवार शोधताना आघाडीची दमछाक 

अर्थमंत्री मुनगंटीवारांच्या विरोधात उमेदवार शोधताना आघाडीची दमछाक 

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : बल्लारपूर मतदारसंघात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विकासकामांच्या भरवशावर विजयी होण्याचा आत्मविश्‍वास आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात कॉंग्रेसला मोठी आघाडी मिळाली. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली. मात्र, मुनगंटीवारांना लढत देऊ शकेल, असा उमेदवार शोधताना आघाडीची चांगलीच दमछाक होत आहे.

सोबतच पाच वर्षांपूर्वी मुनगंटीवार यांनी घेतलेला दारूबंदीचा निर्णय त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील मतदारांच्या किती पचनी पडला, हेसुद्धा विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होईल. 

सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर मतदारसंघात सर्वाधिक निधी दिला. याच मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या विकासकामांची प्रशंसा विरोधकही करतात. मात्र, लोकसभा निवडणुकीत या विकासकामांची जादू चालली नाही. कॉंग्रेसला तब्बल 31 हजारांची आघाडी या मतदारसंघातून प्रथमच मिळाली. त्यामागे जातीय समीकरण होते. तसेच दारूबंदीचा मुद्दाही होता, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

दारूवाला की दूधवाला यावर लोकसभा निवडणूक लढली गेली. खासदार बाळू धानोरकरांचे यवतमाळ जिल्ह्यात दारूविक्रीचे दुकान आहे. तरीही, मतदारांनी त्यांना पसंती दिली. विशेष म्हणजे दारूबंदीचा निर्णय घेणाऱ्या मुनगंटीवार यांच्याच मतदारसंघात 31 हजारांची आघाडी कॉंग्रेसला मिळाली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात मुनगंटीवार यांच्यासोबत त्यांनी घेतलेल्या दारूबंदीच्या निर्णयाची परीक्षा होईल, असे बोलले जात आहे. 

या मतदारसंघात ओबीसी, अनुसूचित जाती, जमाती, मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदार आहे. मुनगंटीवारांविरोधात आजवर कॉंग्रेस एकदिलाने कधीच मैदानात उतरली नाही. त्याचा फायदा मुनगंटीवारांना आजवर होत गेला. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या एकीने समीकरण बदलले. याची भीती मुनगंटीवार समर्थकांना आहे. मात्र, विकासकामे या भीतीवर मात करतील, अशीही आशाही त्यांना आहे. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांनी 43 हजार मतांची आघाडी घेतली. मात्र, लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला आघाडी मिळाली. या आघाडीमुळे राजकीय समीकरण बदलले, असे कॉंग्रेसला वाटत आहे. माळी समाजातील अनेकांनी उमेदवारीचा दावा केला. या समाजातील मतदारांची संख्या येथे लक्षणीय आहे. लोकसभेत वंचित आघाडीचा उमेदवार याच समाजाचा होता. हा भाजपचा पारंपरिक मतदार आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत हा समाज मोठ्या संख्येने वंचितकडे वळला. वंचितने सर्वाधिक मते बल्लारपूर मतदारसंघातूनच घेतली होती. त्यामुळे भाजपला कॉंग्रेसपेक्षा वंचितचा उमेदवार कोण, याचीच चिंता जास्त सतावत आहे. 

आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीला कॉंग्रेसला मिळू शकतो, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढविला आहे. कॉंग्रेस येथे सातत्याने पराभूत होत आहे. आघाडीत राष्ट्रवादीला जिल्ह्यात एकही मतदारसंघ मिळणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे कॉंग्रेसही राष्ट्रवादीच्या गळ्यात बल्लारपूर मतदारसंघ बांधू शकतो. कॉंग्रेसकडून प्रकाश देवतळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत, विनोद अहीरकर, एम. व्यंकटेश बालबहिरय्या, संजय मारकवार यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

या मतदारसंघात मागील पाच वर्षांच्या काळात बीआरएसपीचे राजू झोडे यांनी जनसंपर्क वाढविला. आंदोलनांच्या माध्यमातून मतदारांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला. ते निवडणुकीला उभे राहणार आहेत. पक्षासंदर्भात अद्यापही त्यांनी मौन बाळगले आहे. बहुजन वंचित आघाडीकडून कॉंग्रेसचे नगरसेवक ऍड. पवन मेश्राम रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहे. सध्यातरी या मतदारसंघात भाजपसाठी पोषक वातावरण आहे. आघाडीचा उमेदवार कोण राहील, याविषयी मतदारांमध्ये कुतूहल आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com