cong ncp alliance | Sarkarnama

कॉंग्रेस-राष्ट्रवादीत समन्वय वाढला? 

सरकारनामा न्यूजब्युरो 
गुरुवार, 30 मार्च 2017

आघाडीचे सरकार सत्तेत असताना कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेली कटुता कमी झाल्याचे संघर्ष यात्रेत दिसून आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील एकत्रित आल्याने या दोन्ही पक्षातील समन्वय वाढल्याचे दिसून येत आहे. 

नागपूर : आघाडीचे सरकार सत्तेत असताना कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेली कटुता कमी झाल्याचे संघर्ष यात्रेत दिसून आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील एकत्रित आल्याने या दोन्ही पक्षातील समन्वय वाढल्याचे दिसून येत आहे. 

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, या मागणीच्या समर्थनार्थ कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससह साऱ्याच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी "चांदा ते बांदा' संघर्ष यात्रा 29 मार्चपासून चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव येथून सुरू झाली. पळसगावला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सारेच दिग्गज नेते उपस्थित होते. एवढेच नव्हे तर या दोन्ही पक्षांचे जवळपास 70 आमदारांनी या संघर्ष यात्रेला हजेरी लावली होती. अनेकांनी या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे संघर्ष यात्रा यशस्वी होणार नाही, असा होरा होता. परंतु या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी हा संशय मोडीत काढला. 

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मतभेद टोकाला गेले होते. विधानसभा निवडणुकीतील पराभव पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे झाल्याची टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उघडपणे केली होती. या पार्श्‍वभूमीवर संघर्ष यात्रेतील या सर्व नेत्यांचा एकोपा ठळकपणे दिसून येत आहे. जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये अनेक जिल्ह्यात या दोन्ही पक्षांची आघाडी झाल्याने स्थानिक नेत्यांमधील अधिक विश्‍वासाचे नाते निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. 
पळसगाव ते यवतमाळपर्यंत सारेच नेते एकत्रित होते. ही यात्रा यशस्वी करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड व कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार या तरुण नेत्यांवर सोपविली आहे. विदर्भात उन्हाची लाट सुरू असतानाही संघर्ष यात्रेत कॉंग्रेस कार्यकर्ते व शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. ही बाब या नेत्यांना समाधान देणारी आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख