this Confrontation Of sangali i am guest | Sarkarnama

हा वाद सांगलीचा, मी तर पाहुणा!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

...

कडेगाव : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मिरजेत वसंतदादा पाटील यांच्या वारसांवर केलेल्या टोलेबाजीवर बोलण्यास कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नकार दिला.

"हा सांगलीचा वाद आहे. त्याविषयी इथल्या लोकांना विचारा. मी तर पाहुणा आहे', असे सांगत थोरात यांनी पत्रकार परिषद संपवली. श्री. थोरात हे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांनाच सारे वाद निस्तरायचे आहेत, याचा विसर पडला की काय, अशी चर्चा मात्र रंगली.

 

"आम्ही नाही तर मग कुणीच नाही, हा राजकारणातील ट्रेंड घातक आहे'', असा टोला शरद पवार यांनी काल मिरजेत लगावला होता. सांगली विधानसभा मतदार संघातील प्रचार आणि निकाल यावर त्यांचे हे भाष्य होते. वसंतदादा पाटील यांच्या वारसांचे नाव न घेता त्यांनी टोलेबाजी केली होती. सांगली येथे या ट्रेंडमुळेच कॉंग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांचा निसटता पराभव झाला. तसेच येथे कॉंग्रेस, राष्ट्रवादी एकदिलाने लढली का, याबाबत मी जास्त बोलणार नाही, कार्यकर्त्यांनी मला नेमके काय म्हणायचे आहे ते समजून घ्यावे, असे विधान केले होते.

जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनीही पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद लावली असती तर वेगळे चित्र दिसले असते, असे वक्तव्य केले होते.
बाळासाहेब थोरात आज सकाळी कडेगाव येथे महसूल विभागाच्या आढावा बैठकीसाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांनी पवार यांच्या टोलेबाजीवर छेडले असता थोरात म्हणाले,""हा सांगली येथील विषय असल्याने सांगलीवाल्यानी मला याबाबत कशाला विचारावे. पाहुण्यांना विचारावयाचा हा प्रश्न आहे काय?''

बाळासाहेब थोरात हे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सांगलीतील कॉंग्रेस अंतर्गत गटबाजी नेहमीच कॉंग्रेससाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यावर थेट शरद पवार यांनी विधान केले, तेही कॉंग्रेस नेत्यांच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून. त्यामुळे हा विषय कॉंग्रेससाठी "पाहुणे' म्हणून हलक्‍यात घेण्यासारखा नक्कीच नाही. त्यातही प्रदेशाध्यक्षांनी तर नाहीच नाही. त्यामुळे थोरातांनी हात वर केले असले तरी भविष्यात त्यांना या विषयात लक्ष घालावे लागणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख