complaint against 8 corporators to kolhapur range IG | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : साताऱ्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांची तडकाफडकी बदली. त्यांच्या जागी रत्नागिरीचे सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोल्हापुरातील 8 नगरसेवकांच्या मुसक्या नांगरे पाटील आवळणार?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

अशाप्रकारे बांधकाम व्यावसायिक संघटनेने एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रार देण्याची राज्यातील पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे. 

कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिकांची प्रतिथयश संस्था असलेल्या 'क्रेडाई'ने खंडणीबहाद्दर नगरसेवक व आरटीआय कार्यकर्त्यांची यादी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना दिल्याने जिल्ह्यात एकच गोंधळ उडाला आहे. यात 8 विद्यमान नगरसेवक, 3 माजी नगरसेवक, 3 माहिती अधिकार कार्यकर्ते व पोलीस रेकॉर्डवरील 5 गुन्हेगारांचा समावेश आहे. 

खाजगी सावकारीतून बांधकाम व्यावसायिक सुनील गेंजगे यांनी आत्महत्त्या केली. गेंजगे यांना खाजगी सावकारीतून जसा त्रास झाला, तसेच बांधकाम व्यावसायिकांना अनेक आजी-नगरसेवक व माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून त्रास होत असल्याची तक्रार 'क्रेडाई' या संस्थेने पत्रकार परिषदेत केली होती. पत्रकार परिषदेनंतर या संघटनेने ब्लॅकमेल करणाऱ्यांची यादी पोलीसांना देत कारवाई करण्याची मागणी केली आहे. ठराविक नरसेवक व माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे साटेलोटे आहे. एखाद्या विषयात कार्यकर्त्याने माहिती मागवायची व त्याचा वापर करुन या नगरसेवकांनी बांधकाम व्यावसायिकाला ब्लॅकमेल करायचे, असा प्रकार सुरु असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

'क्रेडाई' संस्थेने या खंडणीबहाददर लोकप्रतिनिधींची माहिती पुराव्यासह जिल्हा पोलीस प्रमुखांना सादर केली आहे. यामध्ये मोबाईलवर करण्यात आलेली चर्चा, आर्थिक मागणीबाबतचे पुरावे, मध्यस्थामार्फत करण्यात आलेली मागणी याचे पुरावे देण्यात आले आहेत. काही वर्षापूर्वी असेच एका लोकप्रतिनिधीवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. अधिकार व ताकतीचा आणि सत्तेचा वापर करुन शहरात व्हाईट कॉलर गुन्हेगारी वाढली आहे. मात्र याचे पुरावे देण्यास कोणी पुढे येत नव्हते. बिल्डरांनी वैयक्‍तीक काही तक्रारी दिल्या होत्या. मात्र सार्वजनिक व संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तक्रार देण्याची ही पहिलीच वेळ आहे. संघटनेच्या या तक्रारीने भल्याभल्या नगरसेवकांना कापरे भरण्याची वेळ आली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख